कोल्हापूर पर्यटनाचा खेळखंडोबा: या कारणांमुळे पर्यटक कोकण-गोव्याला देतात प्राधान्य

 कोल्हापूर : कोल्हापुरात रोज सरासरी ७० हजारांवर पर्यटक येतात. सुटीच्या हंगामात ही संख्या सव्वा ते दीड लाखापर्यंत जाते. त्यांच्यासाठी जिल्हाभरात दोन हजारांवर हॉटेल व यात्री निवासात राहण्यासाठी १५ हजार खोल्या आहेत. यातील ६५ टक्के खोल्या शहरात, तर उर्वरित ३५ टक्के खोल्या ग्रामीण भागात आहेत. ही सुविधा अपुरी आहे. शहरापासून ग्रामीण पर्यटन स्थळे दूर आहेत. ग्रामीण पर्यटन स्‍थळावर राहण्यासाठी सुविधा नाही. ही मोठी अडचण असल्याने बहुतांशी पर्यटक कोल्हापुरात न थांबता कोकण-गोव्याकडे वळतात. प्रेक्षणीय स्थळांजवळ ग्रामीण भागात यात्री निवास, होम स्टेच्या सुविधा अधिक झाल्यास पर्यटकांची व्यवस्था होईल. स्थानिक उलाढाल व रोजगार वाढेल.कोल्हापुरात येणारे ६० टक्के पर्यटक पहिल्यांदा श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतात. त्यानंतर स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात. तोपर्यंत सायंकाळ होते. यातील काहीजण शहरात निवास करतात. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरातील यात्री निवास हाऊसफुल्ल होतात. काही वर्ग शहरातील अन्य हॉटेलमध्ये मुक्काम करतो. एका रात्रीच्या मुक्कामासाठी दोन-अडीच हजार रुपयांचे भाडे मोजावे लागते.यातही दोन कुटुंबे असतील तर पाच हजार रुपये द्यावे लागतात. हे टाळण्यासाठी सायंकाळनंतर बहुतेक पर्यटक कोकणकडे प्रवास करतात. येथेच स्थानिक पर्यटन उलाढालीला खीळ बसते. अशा पर्यटकांसाठी कोल्हापूर किंवा अवतीभोवतीच्या ग्रामीण भागात राहण्याची सुविधा झाल्यास मुक्काम वाढेल.

त्यावेळी सकाळचा नाश्‍ता, दुपारचे जेवण, प्रेक्षणीय स्थळांवरील खरेदी तसेच प्रेक्षणीय स्थळांच्या जागेचा कर, पार्किंग कर, इंधन अशी किमान पाच प्रकारची उलाढाल स्थानिक पातळीवर वाढेल. स्थानिक अर्थकारणाला बळ लाभेल. पती-पत्नी व दोन मुले असे चौकोनी कुटुंब पर्यटन स्थळी एका दिवसाला कमीत कमी ३ हजार रुपये खर्च करते. अशी किमान तीनशे कुटुंबे मुक्कामी राहिली तर एका दिवसात जवळपास दहा लाखांची उलाढाल वाढेल, असा हिशेब आहे.स्थानिकांना पर्यटन व्यवसायाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न अपवादानेच झाला. परिणामी जागा आहे; पण बांधकाम नाही. बांधकामाला कर्ज मिळाले तर यात्री निवास, होम स्टे बांधले जातील. पर्यटक येतील, व्यवसाय वाढेल. यातून ग्रामीण भागात पर्यटन स्थळी गर्दी वाढल्यास उलाढाल वाढून तेथील जगणे सुसह्य होईल.

हे अपेक्षित...

होम स्टे सुविधा सात तालुक्यांत शक्य

येथे चहा, नाश्‍ता, घरगुती पद्धतीचे भोजन देणे शक्य

स्थानिक पदार्थ जेवणात वाढले तर मागणी वाढेल

भुदरगड, राधानगरी-दाजीपूर, आजरा, चंदगड,

रामलिंग-हातकणंगले येथे होम स्टेची गरज

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने