हातात कागदपत्रे नसलेले शिवाय वकील म्हणजे बॅटविना तेंडुलकर ! सरन्यायधीशांची टिप्पणी

नवी दिल्ली : आपल्याला युक्तिवाद करायचा असलेल्या खटल्याची संपूर्ण माहिती (ब्रीफिंगची प्रत) न घेता न्यायालयासमोर येणारे वकील म्हणजे क्रिकेटच्या मैदानात बॅट न घेता असलेल्या सचिन तेंडुलकर सारखे आहे, अशी मिश्किल टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज, शुक्रवारी केली.न्या. चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी सुरू असलेल्या एका प्रकरणातील संबंधित वकील जेव्हा हातात कागदपत्रांची संक्षिप्त प्रत न देता त्याच्या खटल्याचा युक्तिवाद करू लागले तेव्हा न्या. चंद्रचूड यांनी वरील टिप्पणी केली.ते म्हणाले की "ब्रीफ (खटल्याच्या माहितीचे कागद) हातात नसलेले वकील म्हणजे बॅटविना मैदानात उतरणाऱया सचिन तेंडुलकरसारखेच असतात. तुम्ही तुमच्या गाऊनमध्ये आणि बँडमध्ये असता, पण कागदपत्रे तुमच्या हाती नाहीत हे पाहणे खूप वाईट आहे. सुनावणीवेळी तुमचे ‘ब्रीफिंग' नेहमी तुमच्याजवळ असले पाहिजे."
जामीन प्रकरणांची सुनावणी वाढवा - चंद्रचूड

न्यायमूर्तींसमोरच्या पुरवणी यादीतील प्रलंबित खटल्यांची प्रकरणे कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्येक खंडपीठ दर दिवसाला किमान १० हस्तांतरण आणि जामीन प्रकरणांची सुनावणी करेल असेही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज स्पष्ट केले.नुकत्याच झालेल्या पूर्ण न्यायासनाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. या गतीने सर्वोच्च न्यायालयातील १३ खंडपीठे दररोज किमान १३० प्रकरणे आणि दर आठवड्याला ६५० प्रकरणे निकाली काढतील. सध्या सर्वोच्च न्यायालयात खटले या न्यायालयातून त्या न्यायालयात हस्तांतरित करण्याबाबतची तब्बल १३ हजार प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.

जामीन देण्याबाबतच्या खटल्यांनाही प्राधान्य दिले जाईल असे सांगून न्या. चंद्रचूड म्हणाले की "सर्व न्यायाधीशांनी मला पूरक (सप्लीमेंटरी) खटल्यांच्या सुनावणीची यादी न देण्याची विनंती केली आहे. कारण न्यायमूर्ती सकाळपासून दुपारी वाजेपर्यंत खटल्यांचे वाचन व सुनावणीचे कामकाज करत आहेत. त्यामुळे आपण पूरक खटल्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत,‘‘ मात्र सर्व खंडपीठे दररोज जामीन देण्याबाबतची १० प्रकरणे घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने