दिग्गज आयटी कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांना नारळ; जाणून घ्या, कर्मचारी कपाती मागचं कारण

मुंबई :  मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर $44 अब्ज मध्ये विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने ट्विटरच्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एवढ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे कारण कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधार करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेताच मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे सीएफओ, सीईओ आणि पॉलिसी चीफ यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्विटरसोबतच अनेक मोठ्या टेक कंपन्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत.ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी 45 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अनेक लहान-मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यासोबत कंपन्यांनी नवीन नोकरभरतीही थांबवली आहे. यामध्ये कोरोना काळात ऑनलाइन व्यवसायातून मोठी कमाई करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन व्यवसायामुळे कंपन्यांनी जास्त कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केले होते. कोरोनानंतर जास्त कर्मचाऱ्यांची गरज कंपन्यांना नाही. त्यामुळे ही नोकर कपात होत आहे. केवळ अमेरिकन कंपन्याच नाही, तर भारतीय आयटी कंपन्याही नवीन कर्मचारी भरण्यास तयार नाहीत.
कर्मचारी कपातीचे ‘हे’ आहे प्रमुख कारण

खरं तर, जगभरातील टेक कंपन्या आर्थिक मंदीमुळे घाबरल्या आहेत. प्रथम कोरोना लॉकडाऊन आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढत्या अनिश्चिततेमुळे टेक कंपन्यांनी नोकरभरती थांबवली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. यामागचे कारण असेही सांगितले जात आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीत अडचण येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे चीनमध्ये लॉकडाऊन आहे. सध्या पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे टेक कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत.

या' कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी कपात

 • ट्विटर कंपनीने जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

 • नेटफ्लिक्सने 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

 • L&T कंपनीने कामगारांची संख्या 5 टक्क्यांनी कमी केली आहे.

 • टेक महिंद्राने सुमारे 1.4 टक्क्यांनी कामगारांची संख्या कमी केली.

 • विप्रोने 6.5 टक्के कर्मचारी कमी केले आहेत.

 • स्नॅपचॅटने 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

 • शॉपीफाय  कंपनीने आपल्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

 • मायक्रोसॉफ्टने सुमारे 1 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

 • इंटेल कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे.

 • सी-गेट कंपनीने सुमारे 3,000 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.

 • लिफ्ट कंपनीने १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

 • स्ट्राइप कंपनी 14 टक्क्यांनी कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे.

 • ओपनडोअर कंपनी 18 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने