कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही; ममता बॅनर्जींचा दावा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकारण चांगलंच तापलंय. भाजपविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी देखील भाजपसह मोदी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केलीय.निवडणुका जवळ आल्या की भाजपला सीएए, एनआरसी यांसारख्या गोष्टी आठवतात. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबाबत ते वाद घालायला लागतात आणि लोकांना गोंधळात टाकतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. आताची परिस्थिती ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळं 2024 मध्ये पुन्हा भाजप सत्तेवर येणार नाही. हे मी म्हणत नाही तर लोक म्हणत आहेत. त्यांनाच सर्वाधिक जागा मिळतील, असा कोणताही आधार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 2019 मध्ये बिहार आणि झारखंडमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, आता तशी परिस्थिती तिथं नाही. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून भाजपला लोकसभेच्या फारशा जागा मिळणार नाहीत. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन समुदायाच्या सदस्यांना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार गृह मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भाजपकडून हा सारा खटाटोप निर्वासितांची मते मिळविण्यासाठी सुरू असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय.

बांगलादेशातून  आलेल्या हिंदू निर्वासित समुदायानं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. याकडं लक्ष वेधत ममता बॅनर्जी म्हणाल्या, निवडणुकीतच त्यांना मतांची आठवण येते. पण, तुमचे नागरिकत्व कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. काहीही झाले तरी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार सीएए लागू करू देणार नाही. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं त्यांना सत्तेत येणं सहज शक्य झालं. मात्र, आता परिस्थिती बदलली असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वाट्याला फारशा जागा येणार नाहीत, असा दावाही बॅनर्जींनी केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने