नागपूर : गुवाहाटी येथे संपलेल्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी साताऱ्याच्या आंतरराष्ट्रीय धावपटू सुदेशना शिवणकरने २० वर्षांखालील मुलींच्या दोनशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. हे तिचे स्पर्धेतील दुसरे पदक असून १०० मीटर शर्यतीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल १५ पदके जिंकली. त्यात एक सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा ब्राँझपदकाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्राने आठ सुवर्ण, पंधरा रौप्य आणि पंधरा ब्राँझपदके जिंकली. विश्व ज्युनिअर स्पर्धेत भाग घेतलेल्या सुदेशनाने २४.३४ सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असलेल्या साक्षी सरगरने १८ वर्षे मुलींच्या दोन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत युवा राष्ट्रीय स्पर्धेपाठोपाठ येथेही रौप्यपदक जिंकले. तिने ७ मिनिटे २६.४५ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
इतर पदकविजेते ः रौप्यपदक ः २० वर्षे मुले- ३००० मीटर स्टीपलचेस- धुलदेव घागरे, भालाफेक- शिवम लोहकरे (रौप्य), २० वर्ष मुली- ४०० मीटर हर्डल्स- र्इशा नेगी, श्वेता चिकोडी (ब्राँझ), ३००० मीटर स्टीपलचेस- श्रद्धा हक्के (ब्राँझ), ८०० मीटर- ताई बाम्हणे (ब्राँझ), ३००० मीटर- सृष्टी रेडेकर (रौप्य), १८ वर्षे मुली- ३००० मीटर- सानिका रूपनार (रौप्य), ४०० हर्डल्स- श्रावणी सांगळे (ब्राँझ), १८ वर्षे मुले- लांब उडी- यश खानविलकर (रौप्य), १४ वर्षे मुली- ६०० मीटर- भूमिका नेहाते (ब्राँझ), १६ वर्षे मुली- २००० मीटर- जान्हवी हिरुडकर (रौप्य), १४ वर्षे मुले- ६०० मीटर- रणवीर फरकाटे (ब्राँझ).