निलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार? मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल

मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री भेट झाली. त्यामुळे आता नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे आणि गोऱ्हेंमध्ये अर्धा तास चर्चाही झाल्याचं समोर आलं आहे. या भेटीनंतर अखेर नीलम गोऱ्हेंनी या भेटीबद्दलच मौन सोडलं आहे.नीलम गोऱ्हेंनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. या भेटीचे उलटसुलट अर्थ काढण्याचं कारण नाही, असं सांगत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "मुळात तुमच्याकडे आलेली माहिती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत. मी जेव्हा तिथं गेले तेव्हा १० व्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यासोबतच होते."



ओम बिर्लांकडे काय काम होतं, याविषयी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, "मला त्यांना निवेदन द्यायचं होतं, शुभेच्छा द्यायच्या होत्या. काही विधिमंडळाचे विषय होते, लोकसभा आणि विधिमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित होत्या. त्याबद्दल मी ओम बिर्लांशी चर्चा केली आहे. पण तिथं मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं सुरू होतं. मग तिथं राहुल नार्वेकर आले, त्यांनी पुष्पगुच्छ दिला. मी गेले तेव्हा एकनाथ शिंदे तिथे होते, पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, मला करायचीही नव्हती. "शिंदे गटात जाणार का याबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "तो केवळ योगायोग होता. मी भेटायला गेले तेव्हा मुख्यमंत्री तिथे बसले होते. ते तिथे असताना माझी अपॉईंटमेंट होती वगैरे असं कोणी म्हणत नाही. तो व्यवस्थेचा भाग असल्याने ते तिथे बसले होते. कोणतीही राजकीय चर्चा यामध्ये झाली नाही." शुक्रवारी रात्री मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने