“मी वयाने मोठी…”; नीना गुप्ता यांनी व्यक्त केली सलमानशी रोमान्स करण्याची इच्छा

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सध्या ‘ऊंचाई’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हेदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सलमान खानशी ऑन-स्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा बोलून दाखवली.अलीकडेच नीना गुप्ता ‘गुडबाय’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस 16’ च्या सेटवर पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी सलमान खानबरोबर काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता यांनी सलमान खानसोबत खूप धमाल केली होती. दरम्यान, नवभारत टाइम्सशी बोलताना नीना गुप्ता यांना सलमानबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा नीना गुप्ता यांनी एक जुना किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “मागच्या वेळी मी अनिल शर्माचा चित्रपट केला होता, त्यात सलमानच्या आईची खूप छोटी भूमिका साकारली होती. पण मला त्याच्यासह आणखी जास्त काम करायचंय. मला सलमान आवडतो आणि एक व्यक्ती म्हणून मी त्याला पसंत करते. त्याच्याबद्दल मी जे पाहते, ऐकते ते चांगलं असतं. तो स्वतःचा उदोउदो करत नाही, तो खूप मदत करतो. मला त्याच्याबद्दल या गोष्टी माहीत असण्याचं कारण म्हणजे आम्ही काही वर्षांपूर्वी सांताक्रूझच्या गल्लीत मसाबासाठी ऑफिस भाड्याने घेतेले होते. त्या इमारतीत प्रवेश करताच डाव्या बाजूला लोकांची गर्दी होत होती. तिथे कुणीतरी डॉक्टर यायचे. नंतर मला कळलं की ते सलमान खान करायला लावायचा. तिथे येणाऱ्यांकडून पैसे न घेता मोफत उपचार केले जायचे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नसतानाही एक माणूस म्हणून मला तो आवडतो.”

सलमानबरोबर काम करताना कशी भूमिका साकारायला आवडेल, असं विचारल्यावर नीना गुप्ता म्हणाल्या, “मला सलमानबरोबर एक रोमँटिक चित्रपट करायचा आहे, त्याच्या आईची भूमिका करायची नाही. जेव्हा एखादा ६० वर्षांचा पुरुष २० वर्षांच्या मुलीशी लग्न करू शकतो, तेव्हा माझी आणि सलमानची मैत्री नक्कीच होऊ शकते. आमच्या वयात खूप जास्त फरक नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने