मोदींच्या विरोधातले ते पाच शब्द... जे भाजपच्या विजयाचे शिलेदार बनले

गुजरात : विरोधकांच्या टीकास्रांना कसं निष्प्रभ करायचं आणि त्यांच्याच अस्त्रांवर स्वार होऊन त्याच आयुधाने त्यांनाच कसं नामोहरम करायचं, हे मोदींना चांगलं ठाऊक आहे. मागील काही वर्षांत विरोधकांचे हे गाजलेले पाच शब्द आहेत. ज्या शब्दांनी नरेंद्र मोदींचं नुकसान तर केलं नाहीच, उलट तेच शब्द विजयाचे साक्षीदार ठरले.सध्या गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या राज्यात विधानसभेच्या १८२ जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा ९९ जागांवर विजय झालेला. तर काँग्रेसने धडाकेबाज कामगिरी करत 60 जागांवरुन ७७ जागांवर विजय मिळविला होता. ६ ठिकाणी अपक्षांना गड राखण्यात यश आलेलं. यावेळची निवडणूक मात्र अनेक अर्थांनी विशेष आहे. भाजपला काँग्रेसची भीती तर आहेच. पण आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये ताकद लावलीय.

औकात- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी गुजरात निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे. यावेळी त्यांनी 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को औकात याद दिला देंगे' असं म्हटलं होते. याच औकात शब्दाचं सध्या मोदींनी हत्यार केलंय. आतापर्यंत मोदींनी गुजरातमध्ये आठ सभा घेतल्या आहेत. यामध्ये ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये काँग्रेस आता विकासाचे मुद्दे मांडत नाही. तर माझी औकात दाखवण्याचा भाषा केली जातेय. त्यांचा गर्व बघा... निश्चितपणे ते एक राज परिवारातून येतात. मी मात्र एक साधा लोकसेवक आहे. त्यामुळे माझी काहीच औकात नाही. असं म्हणून मोदींनी काँग्रेसने केलेल्या टीकांचा पाढा वाचला.मौत का सौदागर- २००७मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत तत्कालीन यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदींना 'मौत का सौदागर' म्हटलं होतं. निवडणूक रॅलीमध्ये झालेल्या दंगलींवरुन त्यांनी अशी टीका केली होती. सोनियांची हीच टिपण्णी काँग्रेससाठी 'काळ' बनली. हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत मतांचं विभाजण झाले. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस स्वतःला सावरु शकला नाही. भाजप त्यावेळी ११६ जागांवर विजयी झाला. काँग्रेसला केवळ ५९ जागा मिळाल्या. तर अपक्ष ६ जागांवर टिकाव धरु शकले.

नीच की राजनीति- २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचं उमेदवार जाहीर केलं होतं. मोदींच्या सर्वत्र रॅली, सभा सुरु होत्या. जिकडे-तिकडे मोदीच दिसत होते. दुसरीकडे काँग्रेसमध्ये ताळमेळ नव्हता. यादरम्यान अमेठी आणि रायबरेली येथे निवडणूक प्रचारात बोलतांना प्रियांका गांधींनी मोदींवर निशाणा साधला. 'नीच की राजनीति' असं म्हणून त्यांनी मोदींना डिवचलं. मोदींनी हे शब्दशस्त्र उलटं फिरवलं. ते म्हणाले की, मी 'नीची' (खालच्या) जातीमध्ये जन्माला आलो असेन पण नीच स्तराचं राजकारण करीत नाही. यापूर्वी मला चहावाला म्हणून हिणवलं. आता तर मला जातीवरुन अपमानित केलं जात आहे. खालच्या जातीत जन्म घेणं गुन्हा नाही'' यानंतर काँग्रेस संपूर्ण निवडणूक प्रचारात यावर स्पष्टीकरण देत राहिलं आणि भाजप पुढे निघून गेलं.हीच टिपण्णी २०१७मध्ये मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा केली. गुजरात निवडणूक सुरु होती. राहुल गांधींनी ४० दिवस प्रचार केला. २७ मंदिरांमध्ये ते गेले. जीएसटी, पाटीदार आंदोलन आणि सीएम पदासाठी मोदींचं नाव नसणं; ही सगळी समीकरणं काँग्रेससाठी जमेची बाजू होते. शेवटी मोदींना प्रचारात गती घ्यावी लागलेली. पण तेच झालं. अय्यर यांनी मोदींसाठी 'नीच' शब्दाचा उल्लेख केला. त्यानंतर निवडणुकीचा रंगच बदलला. काँग्रेसला बॅकफूटवर यावं लागलं. राहुल गांधींनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण उशीर झाला. मोदी पुढे निघून गेले होते.

चाय वाला- २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राहुल गांधी यांना चेहरा बनवलं होतं. निवडणुकीपूर्वी पक्षात उत्साह भरण्यासाठी दिल्लीत काँग्रेसचं अधिवेशन बोलवलं गेलं. या अधिवेशनामध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना 'चाय वाला' म्हटलं. ''जर मोदी येथे चहा विकण्यासाठी आले तर काँग्रेस त्यांचं स्वागत करेल'' असं अय्यर म्हणाले होते. काँग्रेसला हे विधान भलतं महागात पडलं. देशातल्या चौका-चौकात असलेल्या चहाच्या हॉटेलांमधून वातावरण निर्मिती होत गेली. एक वेगळंच वातावरण भाजपसाठी तयार झालं. मोदींनी त्यात हित साधत 'चहा'मधून विजयाचा रंग चढवला.

चौकीदार चोर है- २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. थेट मोदींवर त्यांनी हल्ला चढवलेला. ''ज्या चौकीदारावर देशाच्या तिजोरीची जबाबदारी होती त्यानेत चोरी केली.'' असं म्हणून राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' अशा घोषणा दिल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचा प्रत्येक नागरीक चौकीदार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात मोदी सरकारला क्लिनचिट दिली. शिवाय याच मुद्द्यावरुन संसदेत सुरु असलेल्या गदारोळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार बाजू लावून धरली. ही घोषणा काँग्रेससाठी बॅकफायर ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने