संतोष बांगर यांची पुन्हा सटकली; मंत्रालयातच घातली हुज्जत

मुंबई : आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण आता राज्याला माहिती झालेलं आहे. त्यांनी आज पुन्हा एक नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मंत्रालयातच त्यांनी हा कुटाणा केल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदेखील केलीय.हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांनी यापूर्वी हिंगोलीमध्ये कामगार विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या उपहारगृहात राडा घातला होता. उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला त्यांनी कानशिलात लगावलेली. त्यानंतर हिंगोलीमध्ये पीक विमा कंपनीच्या कार्यालयात त्यांनी तोडफोड केली. एकूणच एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे आणि वादामुळे संतोष बांगर चर्चेत असतात.
आज संतोष बांगर हे गार्डन गेटने मंत्रालयात जात होते. त्यांच्यासोबत दहा-पंधरा कार्यकर्ते होते. मात्र तेथील पोलिसांना त्यांना रोखलं. पास नसल्याने एवढ्या कार्यकर्त्यांना पोलिस आत सोडत नव्हते. शेवटी आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केली.संतोष बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सीसीटीव्ही चेक करुन सत्य शोधू शकता, अशी भूमिका संतोष बांगर बोलून दाखवली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना सांगितलं की, 'मुख्यमंत्र्यांना समज देऊनही संतोष बांगर ऐकत नाहीत. संतोष बांगर आणि वाद हे समीकरण आता सर्वांना माहिती झालेलं आहे.'

''पोलिसांसोबत मी अजिबात हुज्जत घातलेली नाही. पोलिस बांधव हे आपल्यासाठीच ड्युटीवर असतात. आमदारांसोबत पाच-दहा कार्यकर्ते असतात. पोलिस त्यांना आत सोडतात. त्यामुळे मंत्रालयाच्या गेटवर कुठलाही वाद होण्याचा प्रश्नच नाही.'' अशी बाजू बांगर यांनी मांडली. मात्र ज्या पोलिस कर्मचाऱ्याला बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवला जातोय, त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने