जयंती, दुधाळीतील गाळ काढण्यास प्रारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर महापालिकेची यंत्रणा गतिमान झाली. जयंती नाल्यातून ओसंडणारे सांडपाणी रोखण्यासाठी गाळ काढण्यास सुरुवात केली. तसेच दुधाळी नाल्यातील जादाचे सांडपाणी उपसण्यासाठी उद्यापासून पंप बसवण्यात येणार आहे.पाऊस संपला तरी गेल्या महिन्यापासून जयंती नाल्यातील सांडपाणी ओसंडून वाहत होते. त्यासाठी कळंबा तलावातील पाणी येत आहे, गाळ साठला आहे, अशी कारणे महापालिका देत होती. गाळ काढण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास महिना गेला. गेल्या आठवड्यात त्याच्या निविदेसाठी जाहिरात काढली होती.



ती प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात व्हायला डिसेंबर उजाडला असता. तोपर्यंत सांडपाणी ओसंडून वाहतच राहिले असते. प्रजासत्ताक सामाजिक संस्था व कॉमन मॅन संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तातडीने शुक्रवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. तातडीने काल शनिवारी सुटीच्या दिवशीही पोकलॅंड आणून बंधाऱ्याजवळील गाळ काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाण्याचा जास्त वापर होण्याचा कालावधी सोडल्यास इतर वेळी ओसंडणारे सांडपाणी थांबले आहे.आणखी गाळ काढल्यास सांडपाणी ओसंडणे पूर्ण थांबणार आहे. दुधाळी नाल्यातील राबाडे मळा व शिंदे विहीर येथील वाहून जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी तिथे पंप बसवले जाणार आहेत. त्यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत जाण्याऐवजी जयंती नाल्यातील संप हाऊसमध्ये येऊन तिथून ते कसबा बावडा प्रक्रिया प्रकल्पाकडे उचलले जाणार आहे.

नोटीसची प्रतीक्षा कशासाठी?

महापालिकेला ‘जयंती’तील सांडपाणी रोखायचे असते तर नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका ओळखून तातडीचे काम म्हणून गाळ काढता आला असता. पण, प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस येईपर्यंत काहीही केले नाही. पाणी आपोआप कमी होईल, या आशेवर थांबली. शेवटी नोटीस आल्यानंतरच महापालिकेची यंत्रणा हलली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने