दक्षिण अमेरिकेत डाव्या विचारसरणीची लाट

दक्षिण अमेरिके: दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डाव्या विचारसरणीचे माजी अध्यक्ष लुई इनासिओ लुला द सिल्व्हा हे काठावरचे बहुमत मिळून निवडून आले. या विचारसरणीची लाट दक्षिण अमेरिकेत पसरली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी व माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचा पराभव झाला. लुला यांना 50.9 टक्के, तर बोल्सोनारो यांना 49.1 टक्के मते मिळाली. त्यांचा कामगार पक्ष (वर्कर्स पार्टी) निवडून आला. बोल्सोनारो यांचा उदार पक्ष ( द लिबरल पार्टी) पराभूत झाला.अमेरिकेत गेल्या निवडणुकामध्ये झालेल्या निवडणुकात डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडन निवडून आल्यावरही आपण जिंकलो आहोत व ``मतदानामध्ये घोटाळे झाले,`` असा आरोप मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्याच मूडमध्ये बोल्सोनारो असल्याचे व निवडणुकीला आव्हाने देणार असल्याचे कालपर्यंत बोलले जात होते. त्यांच्या समर्थकांनी सत्ता हातात घेण्यासाठी लष्करावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, बोल्सोनारो यांनी निकालाला आव्हान देण्याचा विचार सोडला असून व पराभव कबूल केल्याचे वृत्त आल्याने तणावग्रस्त झालेली परिस्थिती बऱ्याच प्रमाणात निवळणार, असे दिसते.बोल्सोनारो हे अतिउजव्या विचारसरणीचे असून, त्यांच्या कारकीर्दीत ब्राझीलची वाटचाल लोकशाही असूनही, एकाधिकारशाहीकडे झाली. तिला या निवडणुकीने धक्का दिला. लुला यांच्या कारकीर्दीत ब्राझील पुन्हा समाजवादी समाजरचनेकडे वळेल, असा राजकीय निरिक्षकांचा होरा आहे. या पूर्वी 2003 ते 2010 या काळात लुला अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी राबविलेल्या `बोल्सा फॅमिलिया’ व `फोमे झीरा’ या सामाजिक कार्यक्रमामुळे व क्रांतिकारी सुधारणांमुळे ब्राझीलमधील गरीबी, असमानता दूर होऊन सुमारे 20 दशलक्ष जनता दारिद्र्य रेषा ओलांडू शकली. ब्राझीलच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय नेता म्हणून त्यांची गणना होते. तथापि, त्यांच्या कारकीर्दीतील भ्रष्टाचारामुळे त्यांना दोषी ठरविण्यात आले.`मेन्सालाओ’ गैरव्यवहारात त्यांच्या सरकारने कायदा सम्मत करून घेण्यासाठी 2005 मध्ये संसद सदस्यांची मते खरेदी केल्याचा आरोप होता. त्याबाबत झालेल्या खटल्या विरूद्ध त्यांनी केलेले अपील फेटाळून लावण्यात आले. जैर बोल्सोनारो यांच्या कारकीर्दीत लुला यांना 2018 मध्ये अटक झाली. ते 580 दिवस तुरूंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नंतर निर्दोष ठरविल्याने ते पुन्हा निवडणुकीत उतरले.

ब्राझील हा भारताप्रमाणेच बव्हंशी शेतीवर अवलंबून राहाणारा देश असून, साखर ,उत्पादनात अग्रेसर आहे. साखरेच्या मळीपासून बनविण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादन व वापरात जगातील सर्वात आघाडीचा देश, म्हणून ब्राझीलची ओळख आहे. महाराष्ट्रातून गेली अऩेक वर्षे तेथील साखर कारखान्यांचे व उसाच्या शेतीतील आधुनिकतेचे अध्ययन करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या असंख्य शिष्टमंडळांनी ब्राझीलला भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर श्रीमती प्रतिभा पाटील यांनी 2008 मध्ये पहिला परदेशदौरा केला तो दक्षिण अमेरिकेचा.त्यात त्यानी ब्राझील, मेक्सिको व चिली या तीन देशांना भेटी दिल्या. त्यावेळी लुला द सिल्व्हा हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते, तर फिलीपे कॅल्डेरॉन हे मेक्सिको व श्रीमती मिशेल बेशले या चिलीचे अध्यक्ष होते. या दौऱ्यात श्रीमती पाटील यांच्याबरोबर `सकाळ’ तर्फे या तीन देशांचा दौरा करण्याची संधि मला मिळाली होती. ब्राझीलिया या राजधानीत त्या दोघांची भेट झाली व दुतर्फा सहकार्याबाबत वाटाघाटी होऊन काही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम व पेट्रोलियम खात्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे त्यावेळी भारताचे ब्राझीलमधील राजदूत होते.त्या दिवसात, अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आलेल्या व तरूण वयात कामगार नेता बनलेल्या लुला यांची जोरदार चर्चा होती. अमेरिकेला त्यांचे सत्तेवर येणे रूचणारे नव्हते. त्या काळात लुला आंतररारष्ट्रीय शिष्टाईतील एक आघाडीचे नेते होते. तेहराणमध्ये त्यांची इराणचे माजी अध्यक्ष महंमद अहमदीनजाद व तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप ताइप एर्डोहान यांच्याबरोबर झालेल्या 2010 मध्ये झालेल्या संयुक्त भेटीचे अमेरिकेने `एक्सीस ऑफ इव्हिल’ असे वर्णन केले होते.

ब्राझील हा 8.5 दशलक्ष चौरस कि.मी, क्षेत्रफळ असलेला खंडप्राय देश असून, त्याची 21 कोटी आहे. आकारमान भारताच्या तिप्पट आहे. दक्षिण अमेरिकेतील आर्थिक आघाडीवरचा प्रमुख देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. भारत व ब्राझील हे `ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) व `इब्सा’ (इंडिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका ) या दोन गटात एकत्रपणे काम करतात.लुला यांच्या निवडणुकीनंतर बोल्सोनारो यांच्या काळात वाढलेली बेरोजगारी, गरीबी, चलनफुगवटा कमी होईल, असे मानले जाते. त्याचप्रमाणे, हवामानबदलाला न जुमानणारे व एमेझॉनच्या खोऱ्यातील जंगलात वाटेल तशी जंगलतोड करण्यास परवानगी देणारे बोल्सोनारो यांचे धोरण संपुष्टात येईल, असे मानले जाते. बोल्सोनारो यांनी कोविड 19 साथीदरम्यान आरोग्यविषयक साऱ्या नियमांना धाब्यावर बसविले. त्यामुळे तब्बल पाच लाख लोक मरण पावले. त्याविरूद्ध ब्राझीलमध्ये जोरदार निदर्शने झाली होती.

लुला यांच्या निवडणुकीआधी दक्षिण अमेरिकेतील निरनिराळ्या देशात झालेल्या अध्य़क्षीय निवडणुकात अमेरिका व अमेरिकेच्या धोरणांना विरोध करणाऱे राजकीय पक्ष अलीकडे निवडून आले आहेत. तिला `पिंक टाईड’ असे म्हणतात. त्यात आता मेक्सिको (2018), अर्जेंटीना (2019), बोलिव्हिया (2020), पेरू, होन्डुरास व चिली (2021) व कोलंबिया व ब्राझील (2022) या आठ देशांचा समावेश होतो. व्हेनेझुएलामध्ये कै. ह्युगो चावेझ अध्यक्ष असताना नेतृत्वबदल करण्याचे अमेरिकेने जोरदार प्रयत्न केले होते. तथापि, त्यात य़श आले नाही. उलट, त्यांचे सहकारी निकोलस मादुरो यांना जनतेने निवडून दिले. ते आजही अध्यक्ष आहेत. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता. या राजकीय बदलामुळे अमेरिकेची दक्षिण अमेरिकेतील मित्रराष्ट्रांची संख्या कमी होत आहे,दुसरीकडे, क्यूबामध्ये कम्युनिस्ट नेते व प्रदीर्घ काळ अध्यक्षपदावर राहिलेल्या कै फिडेल कॅस्ट्रो यांच्यानंतर त्यांचे बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे सत्ता परिवर्तन झाले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी क्यूबाबरोबर संबंध सामान्य करण्याचे प्रयत्न केले. तथापि, अध्यक्षपदी येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यास सुरूंग लावला.

त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जो बायडन यांनी सत्तेवर आल्यावर मे 2022 मध्ये ट्रम्प यांच्या क्यूबाविरूद्धचे काही धोरणात्मक निर्णय मागे घेतले असून, परस्परांच्या देशात राहाणाऱ्या क्यूबन कुटुंबांना भेटीगाठी घेण्यासाठीचे नियम शिथील केले आहेत. अमेरिकन पर्यटकांना क्यूबात जाता यावे, यासाठी चार्टर्ड विमानसेवा सुरू करण्याचा विचार चालू आहे. तथापि, क्यूबाचे विद्यमान अध्यक्ष मिगुएल डियाझ कॅनेल यांच्याबरोबर बायडन यांचे संबध सौहार्दपूर्ण होण्यास बराच काळ लागेल, असे मानले जाते. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील कम्युनिस्टांच्या डाव्या विचारसरणीची घोडदौड अमेरिकेची डोकेदुखी बनली आहे, हे मात्र खरे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने