‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणाले, “मोदींनी मला सांगितलं की, शिंदेजी हे…”

मुंबई : महाराष्ट्रामधून अगदी शेवटच्या क्षणी गुजरातला गेलेल्या वेदान्त-फॉक्सकॉन आणि टाटा-एअरबस प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे खुलासे मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात केले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आपण वेदान्त-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्या त्यावेळेस चर्चा केल्याचं सांगितलं. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींबरोबर काय चर्चा झाली याबद्दलची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्य सरकारने मोदींना काय सांगितलं आणि त्यानंतर मोदींनी काय आश्वासन दिलं याबद्दलचा खुलासाही मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.महाराष्ट्रातून गुजरातला प्रकल्प जाण्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलेला असतानाच शुक्रवारी याचसंदर्भातून मुख्यमंत्री शिंदेंना मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये जाहीर मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. “आज देशात जीएसटी कलेक्शनमध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. २३ टक्के जीएसटीचा वाटा महाराष्ट्राचा आहे. असं असतानाही दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेले आणि गुजरातला गेले. याचं काय उत्तर द्याल तुम्ही? तुमचं सरकार आल्यानंतर हे प्रकल्प निघून गेल्याचे आरोप करण्यात आले आहेत. एक वेदान्त-फॉक्सकॉनचा प्रकल्प आणि दुसरा टाटा एअरबसचा प्रकल्प जो नागपूरमध्ये सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात होते. हे दोन्ही प्रकल्प गुजरातला गेले आहेत,” असा थेट प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी या प्रश्नाला उत्तर देताना वेदान्त-फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख करत सविस्तर माहिती दिली.

शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याच्या विरोधकांच्या टीकेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी, “तुम्हीच सांगा मला एक दोन महिन्यांमध्ये एवढे मोठे प्रकल्प येतात आणि जातात का? आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत. या दोन-तीन महिन्यात आम्ही एवढे मोठे प्रकल्प पाठवले त्यांना? असं होतं का?” असा प्रतिप्रश्न मुलाखतकाराला केला. तसेच पुढे बोलताना शिंदेंनी हे प्रकल्प बाहेर जाण्यासाठी आधीच्या सरकारने न दिलेला प्रतिसाद कारणीभूत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्र्यांनी अनिल अग्रवाल यांच्याशी बोलणं झाल्याचीही माहिती दिली. “अनिल अग्रवाल परदेशात असताना मी स्वत: त्यांच्याशी बोललो. आम्हाला इथे जो प्रतिसाद आणि सहयोग मिळायला हवा होता तो नाही मिळाला, असं ते म्हणाले,” असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केला.तसेच वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरही आपण चर्चा केल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. “मी याबद्दल पंतप्रधान मोदींशीही बोललो. मोदींनी मला सांगितलं की, शिंदेजी हे पाहा त्यांचा प्रयत्न होता महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा मात्र त्यांना जशापद्धतीचा पाठिंबा अपेक्षित होता तसा मिळाला नाही. मात्र यापुढे महाराष्ट्रासाठी मोठे मोठे प्रकल्प देणार आहोत,” अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींबरोबर झालेल्या चर्चेबद्दल बोलताना दिली. “अनिल अग्रवाल यांना सरकार बदलणार आहे हे ठाऊक नव्हतं. त्यांना वाटलं होतं की हे सरकार असेच कायम राहील. आपण इथे गुंतवणूक गेली तर अडचणीत येऊ,” असंही शिंदे हसत म्हणाले. “अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्येच अनेक महिन्यांपूर्वी आम्ही तिकडे (गुजरातला) जाण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे,” अशी आठवणही मुख्यमंत्री शिंदेंनी करुन दिली.

“टाटा-एअरबसच्या सहकार्य करार तर २०२१ च्या जुलैमध्येच झाला आहे. संरक्षण मंत्रालयाबरोबर हा करार झाला आहे,” असंही शिंदे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या दुसऱ्या प्रकल्पाबद्दल म्हणाले. माहिती अधिकार अर्जामध्ये सर्व सत्य समोर आलं आहे असंही शिंदे म्हणाले आहेत. तसेच प्रकल्प राज्यातून गेल्याचं दु:ख आम्हालाही आहे, असं सांगत शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्रात मोठे प्रकल्प उभारण्यासंदर्भातील विनंती केल्याचं सांगितलं. “आम्ही पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, महाराष्ट्रामध्ये मूलभूत सुविधा आहेत, क्षमता आहे. कुशल कामगार आहेत. सर्व काही महाराष्ट्रात आहे तर आम्हाला मोठे प्रकल्प द्यावेत अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर त्यांनी म्हटलं की तुम्ही चिंता करु नका आम्ही नक्कीच इथे मोठे प्रकल्प उभारु आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल,” असं शिंदे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने