रंकाळ्याचे विद्रुपीकरण हाणून पाडू

कोल्हापूर : रंकाळा हे कोल्हापूरचे वैभव आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या वैभवाचे जर कुणी विद्रुपीकरण करत असेल ते हाणून पाडले जाईल. यात कोणतेही राजकारण न करता रंकाळा वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अर्धा इंचाचेही काम तलावात होऊ देणार नाही. त्यानंतरही काम सुरू केले तरी ते दररोज पाडले जाईल, असा इशारा रंकाळाप्रेमींनी आज दिला. महापालिकेला निवेदन देण्याबरोबरच हरित लवादातही दाद मागण्याची दिशाही निश्‍चित करण्यात आली.शासनाकडून आलेल्या निधीतून रंकाळा तलावात महापालिकेच्या वतीने स्केटिंग ट्रॅक, स्वच्छतागृहे,पार्किंग यासारखी कामे करण्याचे नियोजन आहे. त्याच्या विरोधासाठी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते, रंकाळाप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींची तांबट कमानीच्या परिसरात सायंकाळी बैठक झाली.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव चौगले म्हणाले, ‘शासनाकडून आलेला निधी केवळ खर्ची टाकायचा इतकेच काम केले जात आहे. यासाठी नागरिकांनीच सजग होऊन लक्ष देण्याची गरज आहे. रंकाळा तलावातील अशाच प्रकारच्या कामांसाठी केलेला विरोध महापालिकेने, ज्यांनी निधी आणला त्यांनी न ऐकल्यास वेळप्रसंगी हरित लवादाकडे जाऊ. त्यासाठी मी आज दहा हजार रुपये देतो.’ विकास जाधव म्हणाले, ‘जैवविविधता वाचवण्यासाठी विविध नाल्यांतून होणारे प्रदूषण थांबवावे. तलावाची मोजणी करावी. पक्षी निरीक्षण केंद्रातून कार्यक्रम घ्यावेत. जुने पाणी सोडणे, नवीन पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. हेरिटेज वास्तूचे संवर्धन करा.विश्‍वास पोवार यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करावे लागले तरी चालेल; पण पार्किंग व अन्य कामे हाणून पाडू असे सांगितले. चंद्रकांत खोंद्रे म्हणाले, ‘मजबुतीकरण करा, प्रदूषण थांबवण्यासाठी अनेक निवेदने दिली. मात्र, काहीही काम केलेले नाही. या कामासाठी कोणाचा इंटरेस्ट आहे माहिती नाही. अशा बांधकामांमुळे रंकाळ्याच्या भिंतीवर पाण्याचा दबाव वाढून राजघाटाजवळ भिंत फुटू शकते. शासनाचा निधी वाहून जाऊ नये, कोणाच्या कमिशनसाठी पैसे जाऊ नयेत.’ माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी राजकीय लोकांना न बोलवता शिवाजी पेठेच्या वतीने महापालिकेला निवेदन देऊ. काम सुरू केलेच तर अर्धा इंचाचेही काम पाडले जाईल. कायदेशीर लढाई लढू असे सांगितले.चंद्रकांत पोवार म्हणाले, ‘इतक्या वर्षांपासून विविध सात भागातून मिसळणारे सांडपाणी रोखावे म्हणून प्रयत्न करत आहेत; पण त्यावर खर्च करण्याऐवजी अशा विद्रुपीकरणाच्या कामांवर खर्च करण्याचे नियोजन केले जात आहे. प्रथम संवर्धन करावे व नंतरच काय ते सुशोभीकरण करावे.’ डॉ. उमेश चव्हाण यांनी रंकाळा संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे आहे. रंकाळ्याच्या आत एकही बांधकाम होता कामा नये ही साऱ्यांची भूमिका आहे. तज्ज्ञांची समिती नेमावी असे सांगितले. चंद्रकांत सूर्यवंशी, संजय साळोखे, धोंडिराम चोपडे, सचिन पोवार, प्रा. एस. पी. चौगुले, डॉ. संदेश कचरे यांनीही भूमिका मांडली. अमर जाधव यांनी कामांची माहिती दिली. प्रहार प्रतिष्ठानने आयोजित बैठकीस श्रीकांत भोसले, पंडित पोवार आदी उपस्थित होते.

शहर अभियंत्यांचा निषेध

रंकाळा तलावात नियोजित केलेल्या कामांबाबत आनंदराव चौगले यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांनी महापालिकेच्या शहर अभियंत्यांचा शेलक्या शब्दात उल्लेख करत त्यांचा निषेध करत असल्याचे सांगितले.

प्रदूषण बंद करण्याची मागणी

अनेक नागरिकांनी महापालिकेने प्रथम तलावात येणारे सांडपाणी रोखावे. पाणी व्यवस्‍थित असेल तरच इतर सारे करण्याला काही अर्थ राहणार आहे. त्यामुळे महापालिकेने संवर्धनाच्या कामासाठी प्रयत्न करावेत, असे सुचवले.

कंत्राटदाराचा फोन

आताच कंत्राटदार रणजित निकम यांचा फोन आला होता. तलावातील काम करत नाही. संरक्षक भिंत मजबुतीची कामे केली जातील. आतील कामे थांबवत असल्याचे कंत्राटदारांनी सांगितल्याची माहिती रविकिरण इंगवले यांनी बैठकीत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने