संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “राऊत हे लढवय्ये नेते, लवकरच…”

मुंबई:  गेल्या तीन महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांना १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. कथीत प्रत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. दरम्यान, संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.“संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख असे आमचे काही सहकरी आहेत, ज्यांनी काही कारणास्तव अटक करण्यात आली होती. त्यांना आता न्याय मिळतो आहे. यापूर्वी अनिल देशमुखाना जामीन मिळाला, आता संजय राऊतांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनी लवकर बाहेर येऊन जनतेची सेवा करावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावे, हीच आमची अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

“संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख हे आमचे लढवय्ये नेते आहेत. संघर्ष आहे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेला असतो. मात्र, ज्या पद्धतीने तिघांना अटक झाली, हे दुर्देवी होतं. एखाद्यावर जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार कोणत्या परिस्थितीतून जातात, हे मी छगन भुजबळ यांच्यावेळी जवळून बघितलं आहे. त्यामुळे आज संजय राऊतांना न्यायालयाने जो न्याय दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते”, असेही त्या म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने