राज्यपालांना हटवा, सांगण्याचं धाडस तुमच्यात नाही; सेनेचा भाजपा-शिंदे सरकारला टोला

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल कोश्यारी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून राज्यपालांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला आणि गांधी परिवाराला गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हे एखाद्याचं वैयक्तिक मत आहे, असं म्हणतात. हा पळपुटेपणा आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठातल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली आहे. त्यावरुनच सामनातून ही टीका केली जात आहे.राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन जोडे मारो आंदोलन केलं, आता ते जोडे त्यांनी स्वतःच्या कानाखाली मारण्याची वेळ आली आहे, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे. सामनामध्ये पुढे म्हटलं आहे, "महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केला. राजकीय सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरींशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण शिवाजी महाराज हे जुनेपुराणे कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातले हिरो आहेत", असं विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर पाय ठेवला आहे. हे भयंकरच आहे."

भाजपाचे एक आमदार संजय कुटे यांनी आता जाहीर केलं की राज्यपालांनी शिवरायांबद्दल व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तिक आहे. पण घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती व्यक्तिगत मते व्यक्त करू शकत नाही. ती मतं राज्याची आणि राष्ट्राची असतात हे त्या कुटेंना कोणीतरी सांगा. स्वतःच्या अंगलट आलं की वैयक्तिक मते. मग राहुल गांधींची मतंही वैयक्तिक ठरवा. अशा शिवरायद्वेषी राज्यपालांकडून मिंधे फडणवीस मंडळाने शपथ घेतली म्हणून अशा राज्यपालांना लगेच हटवा, असं सांगण्याचं धाडस तुमच्यात नाही, असं म्हणत शिवसेनेने भाजपा शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने