मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या तर शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. याशिवाय शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. तर संजय राऊतांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते संजय सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन सावंत म्हणाले, “मला असं वाटतं की या संदर्भात सगळ्यांनी विचार करायचा आहे. ज्या कारणावरती आम्ही एकत्र आलो, त्या कारणाच्यापूर्वी वैचारिक मतभेद दोन्ही पक्षांमध्ये होते हे स्पष्ट होतं. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. त्यामुळे शिवसेना ज्यावेळी कुठलाही विषय मांडते, त्यावेळी ते विषय लोकशाही आणि संविधानाच्या परिघातले नसले तर ते आम्हाला आवडतात असं नसतं. त्यामुळे हा विषय देशातील सर्वोच्च गोष्टी काय आहे, जनतेला काय वाटतं या दृष्टीने पक्षाने विचार करावा.” एबीपी माझाशी ते बोलत होते.
याशिवाय, “सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले त्यामध्ये कुठल्याप्रकारची ऐतिहासिक मोडतोड नाही ते सत्य आहे. त्यामुळे सत्य कटू असलं तरी ते सत्यच असतं. त्याला आता करणार काय आपणे ते बदलू शकत नसतो. देश चालत असताना तो गांधींच्या विचाराने चालावा, तो सावरकरांच्या विचाराने चालूच शकत नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे.” असंही सचिन सावंतांनी यावेळी म्हटलं.