“मी अजून मेले नाहीये, त्यामुळे…” आजाराबद्दलच्या अफवा ऐकून संतापली समांथा रुथ प्रभू

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. त्यानंतर तिच्या आजारपणाबद्दल बऱ्याच चर्चा होत आहेत. अलीकडेच समांथाने यासंदर्भात एका मुलाखतीत भाष्य केलं. ती तिच्या आजाराबद्दल उघडपणे बोलली तसेच हा आजार खूप गंभीर असल्याचं म्हणणाऱ्यांना तिने फटकारलं आहे.


समांथाच्या मते हा आजार तिच्या जीवाला धोका पोहोचवेल, अशा स्थितीत अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे तिच्या आजारावरून कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत. समांथा म्हणाली, “मी माझ्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे काही दिवस चांगले आणि काही वाईट असतात. कधी कधी एक पाऊल टाकणंही शक्य नसल्याचं मला जाणवतं. पण जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटतं की मी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचले आहे. मी इथे लढायला आले आहे.”

समांथा पुढे म्हणाली, “मला आणखी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी पाहिलंय की अनेक ठिकाणी माझा आजार गंभीर आणि जीवघेणा असल्याचं म्हटलंय. पण मी ज्या परिस्थितीत आहे ती जीवघेणी नाही. या आजारामुळे सध्या तरी माझ्या जीवाला धोका नाही. मी मेले नाहीये, त्यामुळे अशा अफवा पसरवू नका.” एशिया नेट न्यूजने यासंदर्भात वृत्त दिलंय.दरम्यान समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, “काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार असल्याचे निदान झाले. मला वाटले की मी बरे झाल्यानंतर याबद्दल सांगेन, पण याक्षणी त्यातून बरं होण्यासाठी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होईन, असा विश्वास डॉक्टरांना आहे.” समांथा सध्या यशोदा चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने