उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच येणार एकाच मंचावर; राजकीय समीकरणं बदलणार?

नांदेड : राज्यात शिंदे गटानं भाजपशी  हातमिळवणी करत उद्धव ठाकरेंचं सरकार खाली खेचलं आणि आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील राजकारण पुरतं ढवळून निघालं आहे. यानंतर शिवसेनेसह आघाडी सरकारमधील पक्ष आक्रमक झाले असून प्रत्येकानं आपला जनाधार वाढवण्याचं कार्यक्रम घेण्यावर भर दिलेला दिसत आहे.अशात आपल्या पक्षात अनेक नेत्यांना आणि संघटनांना घेण्याची देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे  नेते प्रकाश आंबेडकर  यांचं नाव चर्चेत आलं आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणार का, या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू झालीय. उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरूय. आंबेडकरांनी तर शिवसेनेकडं युतीचा प्रस्तावही दिला आहे. मात्र, शिवसेनेनं या प्रस्तावावर कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. त्यामुळं वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकचा मंचावर येणार असल्याचं वृत्त आहे.

हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार असून त्यामुळं राज्यात पुन्हा नवी समीकरणं जुळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. येत्या 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळं हे दोन्ही नेते काय बोलतात आणि एकमेकांना युतीची टाळी देतात का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने