“दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील काही ढोंगी लोक…”, संजय राऊतांचं एकनाथ शिंदे गटावर टीकास्र!

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिली. मात्र, त्यानंतर ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ केल्याचं समोर आलं. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. तसेच, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

“मग सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या”

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्यानंतर त्यावरून भाजपानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, “वीर सावरकरांनंतरचे एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत हे रोज आम्हाला सांगण्याची गरज नाही. वीर सावरकरांना भारतरत्न द्या ना? आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. हिंदुहृदयसम्राटांविषयी एवढंच प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही सावरकरांच्या बरोबरीने भारतरत्न मिळायला हवा. अनेक राजकीय नेत्यांना स्वार्थासाठी भारतरत्न खिताब देण्यात आला आहे. पण बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांना भारतरत्न खिताब का देण्यात आलेला नाही?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.“सावरकरांवर ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या ही शिवसेनेची मागणी आहे. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही मागणी करत आहोत”, असंही ते म्हणाले.“काही राजकीय पक्षांकडून शिवसेना तोडण्याचा प्रयत्न”

“आज आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनाच प्राधान्य देऊन पुढे जातो. कुणी काहीही सांगितलं, कितीही टीका केली तरी बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. शिवसेनाप्रमुखांना जाऊन १० वर्षं झाली. त्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झाला. ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे, त्यांचे विचार आमचे असं ते म्हणत आहेत, हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. ढोंगाला लाथ मारली पाहिजे असं ते म्हणाले. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. पण ती जनता पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच निष्ठावान आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

शिंदे गटाच्या टीकेवर प्रतिक्रिया

दरम्यान, शिंदे गटाकडून ठाकरे गटावर खालच्या पातळीवरची टीका केली जात असल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब जर असते आणि अशा प्रकारचे कंबरेखालचे घाव झाले असते तर बाळासाहेबांनी त्यांची अवस्था फार वाईट करून ठेवली असती. बाळासाहेबांचे फटकारे, भूमिका, विचार यामुळे महाराष्ट्राला मजबुती मिळाली.बाळासाहेबांकडे पाहिलं तर आजही वाटतं की राज्याचं नेतृत्व किती खुजं झालं आहे. बाळासाहेबांच्या नावाने जे तोतये निर्माण होत आहेत. ते फार काळ टिकणार नाहीत”, असं राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने