भारत जोडोयात्रेनिमित्त कोल्हापुरात अन्य पक्षांचीही मोट बांधण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करीत असताना कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांचीही मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह इतर पक्ष सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर, स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव हे सर्व पक्षांना सोबत घेऊन उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात दौरा करणार आहेत.काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरू झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. कोल्हापुरात या निमित्ताने राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्याची जय्यत तयारी सुरू आहे.भारत जोडो यात्रेचा प्रसार करण्यासाठी राज्यातील पहिला मेळावा जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात पार पडला होता. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी संकल्पनेचे कौतुक करतानाच यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. दोन दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असता भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी, ठाकरे गट सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय आमदार पाटील यांनी या यात्रेचा प्रचार होण्यासाठी खास १३ डिजिटल रथ तयार केले आहेत. त्यातून गांधी यांचे पदयात्रेचे थेट प्रक्षेपण, वैशिष्ट्यपूर्ण घटना, राहुल गांधी यांच्या सभेतील भाषणे आदीचे प्रक्षेपण केले जात आहे. यात्रेविषयी लोकांमध्ये जागरूकता करण्याचे काम या माध्यमातून प्रभावीपणे होताना दिसत आहे.

यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत असताना कोल्हापुरात भाजपेतर सर्व पक्षांचा समावेश राहावा असाही प्रयत्न सुरू आहे. यासाठी स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोल्हापूरमधून नफरत छोडो संविधान बचाव संवाद यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. याच्या नियोजनाची एक बैठक गेल्या महिन्यात इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी येथे पार पडली होती. आता बुधवारी कोल्हापूर व इचलकरंजी येथे होणाऱ्या यादव यांच्या संवाद यात्रेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, स्वराज्य इंडिया, माकप, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी प्रबोधिनी, लाल निशाण पक्ष, शेकाप, स्वातंत्र सैनिक वारसदार संघटना, राष्ट्रसेवा दल, आदी पक्ष, संघटना यांचा यामध्ये समावेश आहे. दुसऱ्या दिवशी यादव यांच्या जयसिंगपूर, सांगली, इस्लामपूर येथे सभा होणार आहेत. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुख यांच्या समवेत त्यांचा कार्यक्रम होणार आहे. पुणे येथे बैठक घेऊन ते पुढे रवाना होणार आहेत. ‘ राहुल गांधी यांची यात्रा अराजकीय स्वरूपाची आहे. यात्रेत गांधी यांच्याकडून दिला जाणारा संदेश पाहता त्यामध्ये अन्य पक्षांचाही समावेश असला पाहिजे. या हेतूनेच समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू झाला असून योगेंद्र यादव यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अन्य पक्षांनाही एका मंचावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत ‘ असे स्वराज्य इंडियाचे इस्माईल समडोळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने