तुम्ही पहाटेचा शपथविधी केला, ती बेईमानी नव्हती का? शंभूराज देसाईंचा अजितदादांवर घणाघात

मुंबई : एकनाथ शिंदेंनी  शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गट शिंदे गटाविरुध्द आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादीसोबतही पंगा घ्यायचं ठरवलं आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई  यांनी थेट अजित पवारांवरच निशाणा साधायला सुरुवात केलीय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते असून त्यांच्यासोबत ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख एकवटले आहेत. त्यामुळं २०१९ मध्ये जे ४८ तासांचं सरकार अजितदादांनी केलं होतं. ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारलं होतं का? असा सवाल शंभूराज देसाईंनी अजित पवारांना केलाय.
'शिंदे साहेबांनी कधीच बेईमानी केली नाही'

शंभूराज देसाईंनी आज पाटणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. एकनाथ शिंदे ज्या पक्षात राहिले व वाढले, तिथंच त्यांनी बेईमानी केली, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, 'शिंदे साहेबांनी व आम्ही कधीच बेईमानी केलेली नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार जे हिंदूत्वाच्या विचारांपासून बाजूला नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलं. ते शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं आहे.'

त्याला बेईमानी हा शब्द अजितदादा पवार वापरत असतील. तर त्यांनी मागील काळात २०१९ मध्ये जे ४८ तासांचे सरकार केलं होतं. ती बेईमानी नव्हती का? असा सवाल देसाईंनी उपस्थित केलाय. आम्हाला एवढा मोठा भक्कम पाठिंबा मिळत असताना त्यांच्या कृतीला आमच्या भूमिकेला व उठवाला बेईमानी शब्द वापरतात, हे पूर्णपणे चुकीचं असून ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी अजितदादांना दिला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने