कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांची पुन्हा अडवणूक; विजय देवणेंना परत पाठविलं महाराष्ट्रात!

कोगनोळी (बेळगाव) : एक नोव्हेंबरला बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषक काळा दिन पाळतात. त्यामुळं तेथील मराठी भाषकांना पाठिंबा देण्यासाठी जवळच असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसैनिक  कर्नाटकात जाण्यासाठी आले होते. पण, कर्नाटक प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दूधगंगा नदीवर पोलिसांतर्फे पुन्हा अडवणूक करण्यात आली.राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आले. सोमवारी (ता. 31) सकाळी कोल्हापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या शिवसेनेच्या मशाल व भगवा झेंडा मोर्चाची दूधगंगा नदीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवणूक करून कर्नाटकात जाण्यास बंदी केली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक प्रशासनाची गुंडगिरी लक्षात घेऊन मशाल व झेंडा घेऊन राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सुमारे दोन तास राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कर्नाटकात शिवसैनिकांना प्रवेश बंदी

कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश करणारच या उद्देशाने आलेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी प्रवेश बंदी केल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दूधगंगा नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. पोलिसांनी कर्नाटक प्रवेश बंदी केल्याने शिवसैनिक घोषणाबाजी करत परत गेले. मंगळवारी (ता. 1) सकाळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे बेळगावला जाण्यासाठी दूधगंगा नदीवर आले असता दुसऱ्या दिवशीही कर्नाटक पोलिसांकडून त्यांची अडवणूक केली. यावेळी विजय देवणे यांनी आपण कोणत्याही प्रकारचा मोर्चा न घेऊन जाता बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषकांना पाठिंबा देण्यासाठी चाललो आहे. त्यामुळे आपल्याला सोडण्यास सांगितले. पण येथील उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी कर्नाटक प्रवेश बंदी असल्याने सोडले जाणार नसल्याचे त्यांना सांगितले.

मराठी भाषकांना न्याय मिळावा : विजय देवणे

विजय देवणे म्हणाले, मराठी भाषकांना न्याय मिळावा म्हणून शिवसेनेने कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटक शासनाकडून मराठी भाषक लोकांची अडवणूक करणे, दादागिरीचे काम होत आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी जाताना शासनाने दिलेली वागणूक ही निंदनीय आहे. यासाठी पोलिस प्रशासन व शासनाचा निषेध करतो. यावेळी पोलिस उपाधीक्षक व्ही. टी. दोड्डमणी, मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, महादेव एस. एम, तवराप्पा एस. एल, उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह अन्य पोलिसांनी दूधगंगा नदीसह टोलनाक्यावर बंदोबस्त ठेवला होता. महाराष्ट्रातून येणारय़ा वाहनांची तपासणी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने