“राज ठाकरे आमच्यासारखे जिगरबाज, कोणालाही घाबरत नाहीत, एक दिवस…”, शीख व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. राज ठाकरेंची आक्रमक भाषण शैली तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. अनेक तरुण त्यांच्या खमक्या भाषण शैलीच्या प्रेमात असल्याचंही पाहायला मिळतं. मात्र, ही लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर राज्याबाहेरही आहे. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एक शीख व्यक्ती राज ठाकरेंना धाडसी म्हणत त्यांचं तोंड भरून कौतुक करत आहे. तसेच एक दिवस राज ठाकरेंचं नेतृत्व पुढे येईल, असा आशावादही व्यक्त करत आहे. हा व्हिडीओ मनसेचे उपाध्यक्ष रणजीत शिरोळे यांनी ट्वीट केला आहे.व्हिडीओत शीख व्यक्ती म्हणत आहेत, “राज ठाकरे आम्हाला आवडतात, कारण ते आमच्यासारखे आहेत. त्यांच्याकडे लढण्याचं काळीज आहे. जसा शीख समाज कुणालाही घाबरत नाही, तसेच राज ठाकरे कोणालाही घाबरत नाहीत. शीख कुणालाही घाबरत नाहीत, केवळ देवाला घाबरतात. राज ठाकरेही तसेच आहेत. त्यामुळे आम्हाला ते आवडतात.”

“मी एक वयोवृद्ध व्यक्ती बोलतो आहे, राज ठाकरेंचं नेतृत्व एक दिवस नक्की पुढे येईल. त्यांना कोणीही रोखू शकत नाही. मात्र, त्यासाठी वेळ लागेल,” असंही ही शीख व्यक्ती बोलताना दिसत आहे.या ट्वीटमध्ये शिरोळेंनी राज ठाकरे, अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केलं आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने