सोयीनुसार अटकेची कारवाई का?; दिल्लीतील विशेष न्यायालयानेही ‘ईडी’ला फटकारले

नवी दिल्ली : सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसला अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न करताना दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी सक्तवसुली संचालनालयावर (ईडी) ताशेरे ओढले. तुम्ही सोयीनुसार अटकेची कारवाई करू शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सर्व आरोपी अटकेत असताना जॅकलिनला अटक का केली नाही, असा प्रश्न विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ‘ईडी’ला केला. याच न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन दिला होती. गुरुवारी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यात ‘ईडी’ आणि जॅकलिन यांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. ‘ईडी’ने न्यायालयाला सादर केलेल्या निवेदनामध्ये जॅकलिनकडे पैशांची कमतरता नसल्यामुळे ती देशाबाहेर जाऊ शकते, असे म्हटले आहे. त्यामुळे सर्व विमानतळांना सूचना देण्यात आल्याची माहितीही ‘ईडी’ने दिली. त्यावर विमानतळांना सूचना देण्याऐवजी तुम्ही तिला अटक का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. या प्रकरणी सर्व चौकशी पूर्ण झाली असून आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे ‘ईडी’ला कोठडीची गरज नसल्याने जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत जॅकलिनने न्यायालयात धाव घेतली आहे. ‘ईडी’ने सुकेश चंद्रशेखर प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आलेले नाही. तसेच पुरवणी आरोपपत्रातही तिचे नाव नाही. मात्र जॅकलिन आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

‘ईडी’चा वापर दहशतीसाठी: जयराम रमेश

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ‘ईडी’, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा विरोधी पक्षातील नेत्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी, त्यांचा छळ करण्यासाठी गैरवापर करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला, असे रमेश म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने