नारायण राणेंच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेचं प्रतिउत्तर म्हणाल्या हे तर चिंटूचे जोक्स

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे पक्षात नाराज होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात त्यांना पद मिळालं नाही म्हणून त्या नाराज होत्या. त्यामुळे त्या शिवसेना सोडून जाणार होत्या. मी केलेल्या शिफारशीमुळे त्या पक्षात पुन्हा थांबल्या, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला. राणे यांच्या या वाक्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या म्हणण्यात काही तथ्य नाही असं नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या आहेत.

नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, नारायण राणे यांचं विधान हस्यास्पद आहे. राणे यांचं विधान हे चिंटूचे जोक्स आहेत. माझं त्यांच्याशी कधी काहीही बोलणं झालं नाही. त्याचबरोबर 2004 नंतर मी त्यांना कधी भेटलेही नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. तसेच मी शिंदे गटात जाणार नाही. मला तशी गरजच वाटत नाही, असंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.नीलम गोऱ्हे यांनी काल ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांबरोबर नीलम गोऱ्हे यांची तासभर चर्चा केली. या चर्चामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. गोऱ्हे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा तिथे ओमप्रकाश बिर्लाही होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने