गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा दणका; एकमेव आमदाराने सोडली साथ

गुजरात : एकीकडे गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आणि दुसरीकडे पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. अशातच गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार कांधल जडेजा यांनी आगामी राज्य निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती केल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीने पोरबंदरमधील कुतियाना मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर जडेजांचा राजीनामाही आला आहे.



जडेजा 2012 पासून कुतियाना येथून गुजरात विधानसभा निवडणूक जिंकत आहेत. 2017 च्या निवडणुकीत 50 टक्क्यांहून अधिक मताने जिंकुन त्यांनी भाजप आणि कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला होता.“होय, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तिकीट न दिल्याचे कारण त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.” असे गुजरात राष्ट्रवादीचे प्रमुख जयंत बोस्के यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की जडेजा यांनी राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशाची अवज्ञा केली होती आणि भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केले होते.

जडेजा यांनी 11 नोव्हेंबर रोजी कुतियाना येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच दिवशी, राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षासोबत तीन जागांसाठी उमरेठ, नरोडा आणि देवगड बारिया साठी युतीची घोषणा केली आणि त्यांचे उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबरला आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल म्हणजेच मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने