मुश्रीफ-शहापूरकरच ‘किंग’

 गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीत आज आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर व संग्राम कुपेकर यांच्या शाहू समविचारी आघाडीने बाजी मारली. आघाडीने तीन ते साडेतीन हजार मताधिक्यांनी सर्व १९ जागांवर बाजी मारत आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे व शिवाजी खोत यांच्या काळभैरव विकास आघाडीचा धुव्वा उडविला. मुश्रीफ-शहापूरकरांनी केलेल्या एकहाती सत्तेच्या आवाहनानुसार सभासदांनी एकतर्फी कौल दिला.‘गोडसाखर’च्या १९ जागांसाठी शाहू समविचारी व काळभैरव आघाडीत दुरंगी लढत होती. पाच अपक्षही रिंगणात होते. सकाळी संस्था गटाचा पहिला निकाल हाती आला. अप्पी पाटील यांचे चिरंजीव सोमनाथ पाटील यांनी २३७ पैकी १९९ मते घेऊन समविचारी आघाडीच्या विजयाचे खाते उघडले. उत्पादक आणि राखीव गटातील उमेदवारांनी घोडदौड कायम ठेवली. पहिल्या फेरीत म्हणजेच कडगाव-कौलगे व गडहिंग्लज-हनिमनाळ गटात शाहू आघाडीला हजार ते दीड हजारांचे मताधिक्य राहिले. कडगाव-कौलगे गटातील काही गावात शाहू आघाडीला एकतर्फीच मतदान झाले. उलट काळभैरवचा नूल-नरेवाडी या हक्काच्या उत्पादक गटातही करिष्मा चालला नाही. त्यामुळे दुसऱ्‍या फेरीतील म्हणजेच भडगाव-मुगळी व नूल-नरेवाडी गटातही शाहू आघाडीचे मताधिक्य कायम राहिले. अखेरच्या महागाव-हरळी गटातील सभासदांनीही शाहू आघाडीच्या बाजूने एकतर्फी कौल दिला.बहुतांश मतदान केंद्रामध्ये काळभैरव आघाडी मागे राहिली. यामुळे पहिल्या फेरीपासून शाहू आघाडीच्या मताधिक्याचा आलेख वाढत गेला. काळभैरव आघाडीचे स्टार प्रचारक ठरलेले अमर चव्हाण यांच्या विजयाची खात्री बाळगणाऱ्‍यांना चव्हाणांच्या अनपेक्षित पराभवाने धक्का बसला. संस्थापकांचे सुपुत्र संग्रामसिंह नलवडे यांचाही धक्कादायक पराभव झाला. निवृत्त कामगारांच्या थकीत देणीसाठी दीड वर्षे आंदोलन करणाऱ्‍या शिवाजी खोत यांनाही दोन्ही गटांत पराभवाला सामोरे जावे लागले.शाहू आघाडीचे मताधिक्य बाहेर येऊ लागले, त्यानुसार कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. मतमोजणी परिसरातील सारे रस्ते गुलालमय झाले. रात्री उशिरापर्यंत गावात विजयी मिरवणुका सुरू होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित गराडे, युसूफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, सहाय्यक निरीक्षक रोहित दिवसे, उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता.

क्रॉस व्होटिंगची आशा फोल

उमेदवारांच्या समर्थकांनी क्रॉस व्होटिंगची आशा धरली होती. परंतु, गत गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर अंतर्गत राजकारणातून संचालक मंडळात पडलेली दुफळी कारखान्याच्या जीवावर उठल्याचे उदाहरण डोळ्यासमोर होते. यामुळे निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची साऱ्‍यांची आशा फोल ठरवत सभासदांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला एक हाती सत्ता दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने