सूर्यकिरणांनी अंबाबाईचे मुखकमल उजळले

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाईचे मुखकमल उजळले आणि दक्षिणायन किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला. दरम्यान, किरणोत्सवाचा अंतिम टप्पा सुरू असतानाच एक ढग आडवा आला. त्यामुळे किरणोत्सव होईल की नाही, याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच आडवे आलेले ढग बाजूला गेले आणि पूर्ण क्षमतेच्या किरणांनी अंबाबाईच्या मुखकमलावर सोनसळी अभिषेक केला.पाच वाजून एक मिनिटांनी सूर्यकिरणांनी महाद्वाराजवळ मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर २० मिनिटांनी म्हणजेच पाच वाजून २५ मिनिटांनी गणपती मंदिर मागील बाजूस, कासव चौकात पाच वाजून ३२ मिनिटांनी, तर कटांजनापर्यंत पाच वाजून ४३ मिनिटांनी सूर्यकिरणे पोचली. पाच वाजून ४४ मिनिटांनी चरणस्पर्श करून पुढे दोन मिनिटांनी मूर्तीच्या कटेपर्यंत, तर पाच वाजून ४७ मिनिटांनी किरणे कंठापर्यंत पोचली. त्यानंतर लगेचच एका मिनिटात म्हणजेच पाच वाजून ४८ मिनिटांनी मूर्तीच्या मुखकमलावर सोनसळी अभिषेक करीत सूर्यकिरणे डावीकडे लुप्त झाली.

अंबाबाईच्या दानपेटीत तिसऱ्या दिवशी ३५ लाख

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दानपेटीतील मोजदाद सुरू असून तिसऱ्या दिवशी सुमारे ३५ लाख रुपयांची मोजदाद पूर्ण झाली. पहिल्या दिवशी ५० लाख, तर काल (गुरुवारी) ६२ लाख ८९ हजार, अशी एकूण तीन दिवसांत सुमारे दीड कोटी देणगी रकमेची मोजदाद झाली.आजचा किरणोत्सव हा संपूर्ण क्षमतेच्या किरणांनी झाला. आज किरणांची दिशा पाहण्यासाठी मॅग्नोटोमीटर हे तंत्रज्ञान वापरले. किरणोत्सवात किरणांचा अचूक प्रवास नोंदविताना या तंत्राची मदत झाली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने