देवेंद्र फडणवीस म्हणजे कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारेंचा कोल्हापुरात हल्लाबोल

कोल्हापूर : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रबोधनयात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील मतदारसंघात पोहोचलीय. यावेळी त्यांनी व्हिडिओ लावून भाषणाला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. व्हिडिओच्या माध्यमातून अंधारेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याची चित्रफित दाखवली.व्हिडिओ दाखवल्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, 'भाजपनं  द्वेषाचं राजकारण सुरु केलंय. देवेंद्र फडणवीस  द्वेषमुलक राजकारण थांबलं पाहिजे म्हणतात. पण, करत काहीच नाहीत. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसारखी अमराठी माणसं महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. भाजपची मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखत आहे.'उद्धव ठाकरेंनी  हिंदुत्व सोडल्याचं सांगतात, पण हाथरसमध्ये तरुणीचे रात्रीत अंत्यसंस्कार केले हे कोणतं हिंदुत्व सांगतात? अशी विचारणा अंधारेंनी केली. सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. राहुल शेवाळे यांचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नारायण राणेंची मुलं मातोश्रीबद्दल बोलतात, पण कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली नाही. गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, बिल्किस बानो असेल यांच्यावरून महिलांना किती तुच्छतेनं पाहतात ते दिसतं. एकनाथ भाऊ निर्णायक पदावर नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटची बाहुली आहेत. त्यांनी रिमोट चालू केला तर बोलतात, बंद केला तर ते थांबतात. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार उल्हासदादा पाटील, डाॅ. सुजित मिणचेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदी नेते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने