बिग बॉसने अर्चना गौतमला घरातून बाहेर काढलं? शिव ठाकरेशी झालेलं भांडण पडलं महागात

मुंबई : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाची चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या इतर पर्वांप्रमाणे या पर्वामध्येही भांडणं, मारामाऱ्या, रुसवे-फुगवे पाहायला मिळत आहेत. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीमध्ये अव्वल स्थानावर आहे. शोचे नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य कॅप्टन अब्दू रोजिकच्या कॅप्टन्सी कार्याला गुण देत असल्याचे पाहायला मिळते. घरातील सदस्यांपैकी अर्चना गौतम सोडून अन्य सदस्यांनी त्याला चांगले गुण दिले.व्हिडीओच्या शेवटी या प्रकरणावरुन अब्दू व अर्चना यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसले. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, घरातील एका टास्कदरम्यान अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात भांडण सुरु झाले. पुढे अर्चना त्याच्याशी मारामारी करायला लागली. शारिरीक हिंसा केल्याने तिला ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर काढण्यात आले आहे. ‘बिग बॉस १६’ शी निगडीत सर्व अपडेट देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ या ट्विटर अकाऊंटने अर्चना गौतमीची ही बातमी ट्विट केली आहे. यामुळे कार्यक्रमाची फिड काही काळासाठी बंद केली होती अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही याबाबत शोच्या निर्मात्यांनी किंवा कलर्स वाहिनीने अधिकृत घोषणा केली नसल्याने ही अफवा असू शकते असे म्हटले जात आहे.

दरम्यान कलर्स वाहिनीने त्यानंतर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू रोजिकची कॅप्टन्सी टिकावी यासाठी बिग बॉस सदस्यांना नवा टास्क देतात. या टास्कवरुन तो पुढेही घरातला कॅप्टन राहिलं की, कॅप्टनशीपसाठी नव्या स्पर्धकाची निवड केली जाईल हे ठरणार आहे. परिणामी अर्चनाबद्दलची ही बातमी खरी की खोटी हे कार्यक्रमाचा नवा भाग प्रसारित झाल्यानंतर कळणार आहे.अर्चना गौतम बिग बॉसच्या घरातली तगडी स्पर्धक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या खेळामध्ये फरक पडल्याचे दिसत होते. रविवारच्या भागामध्ये सलमान खानही तिच्यावर ओरडला होता. असे असले तरी, तिच्या घराबाहेर पडण्याच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने