“आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

मुंबई: वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत हत्या केल्याचं प्रकरण सध्या देशभरामध्ये चर्चेत आहे. आफताबने गळा आवळून श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिल्याचं तपासात समोर आलं आहे. आई-वडिलांपासून दूर दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धाने पालकांच्या विरोधाला न जुमानता डेटींग अॅपवर भेटलेल्या आफताबवर विश्वास ठेवला आणि ती लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये त्याच्याबरोबर राहत होती. मात्र दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरुन अनेकदा वाद व्हायचे. मागील काही महिन्यापासून श्रद्धाशी संपर्क न होऊ शकल्याने श्रद्धाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आफताबला अटक करुन चौकशी केली असता त्याने धक्कादायक घटनाक्रम सांगितलं.मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये दिल्ली पोलिसांनी शनिवारी आफताबला अटक केली. त्यानंतर त्याने दिलेल्या जबाबामध्ये धक्कादायक घनाटक्रम समोर आला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येसंदर्भातील तपशील अंगावर काटा आणणारा आहे. संबंधित तरुणीच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले असून या प्रकरणामुळे श्रद्धाच्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन तसेच सर्व समाजमाध्यमांची खाती बंद होती. यामुळे तिच्या वडिलांना माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये श्रद्धाने घर सोडून जाताना काय सांगितलं होतं याबद्दलची माहिती दिली आहे.“माझ्या मुलीने (श्रद्धा वालकरने) २०१९ मध्ये तिला आफताब अमिन पूनावालाबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायचं आहे असं माझ्या पत्नीला सांगितलं होतं. मी आणि माझ्या पत्नीने तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं नाही. आम्ही कोळी समाजातील हिंदू आणि तो मुस्लीम असल्याने आम्हाला वेगळ्या धर्मातील आणि वेगळ्या जातीच्या मुलाशी तिने लग्न करु नये असं वाटत होतं,” असं विकास वालकर यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.“आम्ही तिच्या निर्णयावर समाधानी नसतानाही आमची मुलीने (श्रद्धाने) आम्हाला सांगितलं की, “मी आता २५ वर्षांची आहे. मला माझे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मला आफताब अमीन पूनावालाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये रहायचं आहे. आझपासून तुम्ही विसरुन जा की तुम्हाला एक मुलगी होती.” ती घरातून तिच्या कपड्यांची बॅग घेऊन आफताब अमीन पूनावालाबरोबर राहण्यासाठी निघून गेली,” असंही विकास वालकर यांनी म्हटल्याचं वृत्त ‘फर्स्ट पोस्ट’ने दिलं आहे.विकास यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरु झाला. माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात श्रद्धाचा फोन मे पासूनच बंद असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते. ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली आणि त्यांचा संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाड्या च्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. एक बेव सिरिज पाहून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने