मिरवणूक काढत आणलेली 21 लाखांची दुचाकी जळून खाक; डोळ्यांसमोर स्वप्न उद्ध्वस्त!

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या  शुभ मुहूर्तावर एक महिन्यापूर्वीच सुर्वेनगर प्रभागातील दत्त जनाई नगरमधील युवकानं मोठ्या हौसेनं वाजत-गाजत 21 लाखांची दुचाकी घरी नेली होती. ही दुचाकी बघायला नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती. तीच 21 लाखांची दुचाकी आगीत जळून खाक झालीय. या दुचाकीसह एक कारही जळालीय.आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? की अज्ञातांनी लावली याबाबत गूढ कायम आहे. याबाबत दुचाकीचा मालक राजेश आनंदराव चौगुले यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. कळंबा येथील राजेश चौगुले या युवकानं गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक किमतीची दुचाकी खरेदी केली. या आनंदानं त्यानं दुचाकीची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूकही काढली. त्यामुळं गाडीची चर्चा जिल्ह्यात रंगली.

मात्र, राजेश चौगुले याचा हा आनंद काही दिवसांचा ठरला. कारण, आज पहाटे ही गाडी जळून खाक झाली. सोबत शेजारी असलेली चारचाकी गाडीदेखील जळून खाक झाली आहे. पहाटे साडेतीन वाजता दुचाकीला आग लागल्याचं चौगुले कुटुंबाच्या लक्षात आलं. त्यानंतर सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत त्या गाडी शेजारी असलेली त्यांची चारचाकी कारही पूर्णपणे जळाली होती. दरम्यान, या वाहनांना आग कशी लागली? की जाणून बुजून ही आग लावली? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत चौगुले यांनी फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने