मुंबई: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यात महाविकास आघाडीचे नेते सहभागी होत आहे. यावेळी अनेक काँग्रेसचे नेते, कामगार आणि समाजातील इतर लोकही या यात्रेशी जोडले जात आहेत. या यात्रेबाबत अनेक चर्चा आणि वादही सध्या सुरू आहेत. सध्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेदरम्यान असे काही घडले आहे की सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहून गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही अशा शब्दात राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
आमदार अतुल भातखळकर ट्विटमद्धे म्हणतात की, "राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्या इतकी अक्कल या माणसामध्ये नाही. त्याला अंदमान पर्व समजणार नाही त्याची उडी थायलँड पर्यंतच. पांढऱ्या पावडरीचा परिणाम दुसरे काय". पुढच्या ट्विटमद्धे ते म्हणतात की, तुरुंगात सिगरेट फुंकण्यापासून बॅडमिंटन खेळण्यापर्यंत सर्व सोयी उपभोगणाऱ्या नेहरुंच्या पणतूला सावरकरांचा त्याग समजवावा तरी कसा? अशा शब्दात आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरूनही राहुल गांधींवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत असंही ते म्हणालेत.