मुंबई: सध्या एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा फारच कमी येत आहेत. यामागचे एक मोठे कारण म्हणजे गेल्या 3 वर्षात म्हणजे 2019-20, 2020-21 आणि 2021-22 मध्ये 2000 रुपयांच्या नवीन नोटा छापल्या गेल्या नाहीत. एका आरटीआयच्या उत्तरात ही बाब समोर आली आहे.आयएएनएसने दाखल केलेल्या आरटीआय अर्जात असे उघड झाले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नोट मुद्रा (पी) लिमिटेडने 2016-17 या आर्थिक वर्षात 2,000 रुपयांच्या 35,429.91 कोटी नोटा छापल्या, 2017-18 आणि 2017-18 मध्ये 1,115.07 कोटी नोट छापल्या, 2018-19 मध्ये आणखी कमी करून केवळ 4,66.90 कोटी नोटा छापल्या गेल्या. दुसरीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोट मुद्रा (पी) लिमिटेडकडून मिळालेल्या आरटीआयच्या उत्तरात असे दिसून आले आहे की 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये 2,000 रुपयांच्या चलनी नोटांची संख्या कमी झाली आहे.सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नोट बाजारात आणली होती.
देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढले
केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरात (1 ऑगस्ट रोजी) म्हटले आहे की, NCRB च्या डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरून 2,44,834 झाली आहे. आकडेवारीनुसार, 2016 मध्ये देशात जप्त करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती, जी 2017 मध्ये 74,898 पर्यंत वाढली, 2018 मध्ये नोटांची संख्या कमी होऊन 54,776 झाली. 2019 मध्ये हा आकडा 90,566 आणि 2020 मध्ये 2,44,834 बनावट नोटा होत्या.
बँकिंग प्रणालीमध्ये आढळलेल्या 90 टक्क्यांहून अधिक बनावट नोटा निकृष्ट दर्जाच्या होत्या. या नोटांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा तपशील RBI वेबसाइटवर सर्वसामान्यांना दाखवत असते. असे संसदेतील उत्तरात केंद्र सरकारने म्हटले आहे. बनावट नोटा रोखण्यासाठी आरबीआय बँकांना विविध सूचना जारी करते, असेही त्यात म्हटले आहे. सेंट्रल बँक नियमितपणे बँकांचे कर्मचारी/अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात रोकड हाताळणाऱ्या संस्थांसाठी बनावट नोटा शोधण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते.