‘मिस वर्ल्ड २०००’च्या विजेतेपदाचं आधीच झालेलं फिक्सिंग, प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडची देसी गर्ल ते ग्लोबल स्टार असा मोठा पल्ला गाठला आहे. २००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’चं विजेतेपद मिळवत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. पण आता जवळपास २२ वर्षांनंतर प्रियांका चोप्राच्या या विजेतेपदावर गंभीर आरोप केले जात आहेत. माजी मिस बार्बाडोस लीलानी मॅककॉने हिने प्रियांका चोप्राच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. प्रियांकाच्या विजेतेपदाचं आधीच फिक्सिंग झालं होतं असं तिचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेत प्रियांकाला खास ट्रीटमेंट देण्यात आल्याचा आरोपही तिने केला होता.प्रियांका चोप्राबरोबर मिस वर्ल्ड २००० मध्ये सहभागी झालेली लीलानी मॅककॉने आता एक युट्यूबर आहे. तिने जवळपास २२ वर्षांनंतर एका व्हिडीओच्या माध्यामातून धक्कादायक खुलासे केले आहेत. पण लीलानी आता एवढ्या वर्षांनंतर बोलण्याचं कारण काय? तर मिस युएसए ब्युटी पेजेंटमधील एका स्पर्धकाच्या विजेतेपदावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय आणि याचदरम्यान सौंदर्य स्पर्धांमध्येही फिक्सिंग होत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशात आता लीलानीने मिस वर्ल्ड २००० स्पर्धेबाबत मौन सोडलं आहे.

लीलानी मॅककॉने हिने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, “जेव्हा प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा मुकूट जिंकला होता त्यावेळी एक इंडियन चॅनेल या स्पर्धेला स्पॉन्सर करत होतं. आमच्या सॅशेवरही देशाच्या नावाआधी त्या चॅनेलच्या लोगो होता त्यानंतर देशाचं नाव लिहिण्यात आलं होतं.” प्रियांकाबद्दल ती म्हणाली, “ती एकमेव अशी स्पर्धक होती जिने बिकिनी राऊंडच्या वेळी सारोंग परिधान केला होता. तिला तशी परवानगी देण्यात आली होती. याचं कारण सांगण्यात आलेलं की, ती स्किनटोन ठीक करण्यासाठी कोणततरी क्रिम लावत होती पण त्याचा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे स्विमसूट राउंडमध्ये तिला सारोंग परिधान करायचा होता.”याशिवाय लीलानीने प्रियांका चोप्राच्या आउटफिट्सबाबतही गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “ज्या डिझायनरने सर्व मुलीचे ड्रेस डिझाइन केले होते त्याने फक्त प्रियांकाच्या ड्रेसची फिटिंग व्यवस्थित ठेवली होती बाकी सर्व मुलींच्या ड्रेसची फिटिंग बिघडवण्यात आली होती.” लीलानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यानंतर एकीकडे प्रियांका चोप्राच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तर दुसरीकडे अनेकजण तिचं समर्थन करताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने