पाच हजारशिवाय ऊस तोडणार नाही

कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी एकरी तीन ते पाच हजार रुपये द्यावे लागतील. सकाळ-संध्याकाळी नाश्‍ता आणि उसाच्या वाढ्याची विक्री आम्ही करणार, अशा ऊस तोड टोळ्यांच्या अजब आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्या ‘नियम-अटीं’मुळे ऊस उत्पादक मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांच्या ऊस तोड आणि वाहतूक करणाऱ्या मजूरांकडून होत असलेल्या या मनमानीबाबत साखर कारखानदारांनी मात्र मौन पाळले आहे.जिल्ह्यात ऊस तोडणी जोमात सुरू आहे. वेळेत ऊस तोड व्हावी यासाठी शेतकरी प्रत्येक साखर कारखान्याच्या गट अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. शेतात जास्त दिवस ऊस उभा राहण्यापेक्षा एखाद्या वेळेस जेवण-खाणे देण्यास शेतकरी राजी खुशीने तयार असतो. मात्र, आता राजी-खुशी नाही तर ऊस तोड मजूरांची मनमानी सुरू आहे. चौदा ते पंधरा महिने ऊस वाढवायचा. त्याची देखभाल करायची. तोडीच्यावेळी मात्र शेतकऱ्यांची ऊस तोडणाऱ्यांकडून आर्थिक छळणूक सुरू आहे.




तीन रुपये किलोप्रमाणे ऊस कारखान्याला द्यावा लागतो. तो बारा महिन्यात तोडला पाहिजे, अशी अपेक्षा असते. मात्र, चौदा ते पंधरा महिने झाले तरीही तो तोडला जात नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होतो. यावेळी उसाचे वजन कमी होते. या वेळी शेतकऱ्यांचा कमी आणि कारखान्यांचा जास्त फायदा होतो. याकडे दुर्लक्ष करून ऊस तोड सुरू झाल्यानंतर ऊस मालकाने पिकवलेल्या उसाच्या वाड्यावर हक्क दाखवायचा नाही, त्याला थोडीच वैरण दिली जाते. हे अन्यायकारक ठरत आहे. ऊस तोड टोळ्यांना आता एकरी तीन ते पाच हजार रुपये द्यावे लागत आहेत. त्याशिवाय फडात पायही ठेवला जात नाही. साखर कारखानदार याबद्दल मौन बाळगून आहेत. ऊस तोडणी-ओढणीची रक्कम वाढ दिली असतानाही शेतकऱ्यांची लूट कशासाठी असाही सवाल केला जात आहे.एकरी पाच हजार घेतल्याशिवाय ऊस तोड करणारे मजूर शेतात पाय ठेवणार नाही, असे म्हणतात. साखर कारखान्याकडे तक्रार करावी, तर ते लक्ष देत नाहीत. सर्वच बाजूने शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. साखर कारखानदारांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाच्या वैरणीवरही शेतकऱ्यांचा अधिकार नाही. हे सर्वात वाईट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने