शांततेसाठी सर्व देशांना एकत्र येण्याची गरज; कंबोडियाचे आवाहन

कंबोडिया : जगभरातील तणावग्रस्त परिस्थितीचा सर्वांनाच फटका बसत असल्याने सर्व जगाने एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे आावाहन कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांनी आज केले. एकमेकांना सहकार्य करून वाद शांततापूर्ण मार्गाने मिटविण्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन त्यांनी पूर्व आशिया परिषदेच्या उद्‌घाटनावेळी केले.कंबोडियाकडे सध्या आसिआन परिषदेचे अध्यक्षपद आहे. आसियान परिषदेबरोबरच पूर्व आशिया परिषदही सुरु झाली आहे. या परिषदेत रशिया, चीन, भारत आणि अमेरिकेसह अनेक महत्त्वाच्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तैवान प्रश्‍न आणि इतर काही मुद्द्यांवरून चीन आणि अमेरिकेत, तसेच युक्रेन आणि रशियामध्ये वाद सुरु असल्याने जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेला सुरुवात झाली आहे.पंतप्रधान हुन सेन यांनी कोणत्याही विशिष्ट देशावर टीका न करता सर्वांना वाद मिटविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,‘‘खुली आणि बहुस्तरीय व्यवस्था कायम ठेवतानाच सर्व जागतिक नेते एकतेचे महत्त्व जाणून सर्वांसमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जातील, अशी मला आशा आहे. आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शाश्‍वत विकासासाठी आपण केलेल्या प्रयत्नांवर संघर्षामुळे पाणी फेरले गेल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. तणावग्रस्त परिस्थितीमुळे सर्वच देशांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता शांततेसाठी आपण एकत्र येणे आवश्‍यक आहे.’

‘उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देऊ’

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला संयुक्तपणे ठोस प्रत्युत्तर देण्याचा निर्धार आज अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने केला. पूर्व आशिया परिषदेच्या निमित्ताने ज्यो बायडेन यांनी फ्युमिओ किशिदा आणि यून सुक येओल या नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि नंतर तिघांनी एकत्रितही बैठक घेत उत्तर कोरियाच्या आक्रमकपणाला विरोध करण्याचे निश्‍चित केले. या परिषदेवर युक्रेन युद्धाचे आणि तैवानमधील तणावाचे सावट असले तरी या तीन नेत्यांच्या बैठकीत उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. याशिवाय, प्रशांत प्रदेशातील चीनच्या वर्चस्ववादाला आळा घालण्यासाठीही जपान आणि दक्षिण कोरियाबरोबर सहकार्य करणार असल्याचेही बायडेन यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने