कोल्हापूरचा स्वप्नील पाटील अर्जुन पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : भारतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला.भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी अर्थातच २९ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जातो, पण कोरोनासह आणखी काही कारणास्तव गेल्या वर्षी व यंदा हा पुरस्कार इतर दिवशी प्रदान करण्यात आला. टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल याचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याला २५ लाख रुपयांसह पदक देण्यात आले. याप्रसंगी २५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना १५ लाख रुपये देण्यात आले.महाराष्ट्राच्या सहा व्यक्तींना मानाचा पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा व शार्दुल ठाकूरला घडवणाऱ्या दिनेश लाड यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरा नेमबाजांना मार्गदर्शन करणाऱ्या सुमा शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले.फुटबॉल प्रशिक्षक बिमल घोष यांनाही द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. धावपटू अविनाश साबळे, पॅरा जलतरणपटू स्वप्नील पाटील व मल्लखांब खेळाडू सागर ओव्हळकर यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने