ब्राझीलला दुखापतींची चिंता! आज दक्षिण कोरियाशी लढत

कतार: फिफा क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला ब्राझीलचा संघ आणि २८ व्या स्थानावर असलेला दक्षिण कोरियाचा संघ यांच्यामध्ये आज दोहा येथे विश्‍वकरंडकातील उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. कागदावर जरी ब्राझीलचे पारडे जड असले, तरी प्रत्यक्षात या संघातील खेळाडूंना दुखापतींनी ग्रासले आहे.साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत कॅमेरूनकडून ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोर्तुगालवर सनसनाटी विजय मिळवत बाद फेरी गाठणाऱ्या दक्षिण कोरियाविरुद्ध ब्राझीलला सावध राहावे लागणार आहे. ब्राझीलला शनिवारी मोठा धक्का बसला. 

ग्रॅबियल जेसस व ॲलेक्स टेलेस या दोन प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. जेसस काही दिवसांनंतर आर्सेनल या आपल्या क्लबशी जोडला जाणार आहे. तसेच टेलेस दक्षिण कोरियाच्या लढतीनंतर सेव्हीलाशी जोडला जाणार आहे. ब्राझील फुटबॉल संघटनेकडून ही माहिती देण्यात आली.ॲलेक्स सँड्रो व डॅनिलो या दोघांनाही दुखापतीचा सामना करावा लागला आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत सँड्रो याला दुखापत झाली होती. डॅनिलो हाही दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही; मात्र शनिवारी डॅनिलो याने ब्राझीलच्या इतर खेळाडूंसोबत सराव केला. त्यामुळे दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत त्याच्या सहभागाबाबत शक्यता वाढली आहे. सँड्रो याच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्‍नचिन्ह आहे.२० वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठणार?

दक्षिण कोरिया व जपान या देशांमध्ये २००२ मध्ये फिफा विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. यजमान दक्षिण कोरियाने त्या वेळी चौथा क्रमांक पटकावला होता; मात्र त्यानंतर मागील २० वर्षांमध्ये त्यांना या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीही गाठता आलेली नाही. दक्षिण कोरियाने उद्या होणार असलेल्या लढतीत ब्राझीलला पराभूत केल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता येणार आहे.

दक्षिण अमेरिकी संघाचे पारडे जड

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील व आशिया खंडातील दक्षिण कोरिया यांच्यामध्ये उद्या लढत रंगणार आहे. या वेळी दोन देशांमधील मागील लढतींवर नजर टाकता अपेक्षेप्रमाणे ब्राझीलचेच वर्चस्व दिसून येईल. या दोन देशांमध्ये झालेल्या मागील दोन लढतींमध्ये ब्राझीलने दक्षिण कोरियाला हरवण्याची किमया साधली आहे. २०१९ मध्ये झालेल्या लढतीत ब्राझीलने दक्षिण कोरियावर ३-० असा; तर २०२२ मध्ये झालेल्या लढतीत ५-१ असा विजय साकारला आहे हे विशेष.

नेमारचा सराव अन्‌ आनंदाचे वातावरण

एकामागोमाग एक खेळाडूंना दुखापत होत असतानाच ब्राझीलसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. स्टार खेळाडू नेमार याने सराव केला. त्याने फुटबॉलसोबत सराव केला. तसेच शॉट ऑन गोलचा अभ्यासही केला. दोन्ही पायांनी त्याने सराव केला. दुखापतीचा त्रास त्याला होत नव्हता. त्यामुळे दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत त्याच्या खेळण्याची आशा उंचावली आहे. यामुळे ब्राझीलच्या संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने