अर्जेंटिनासमोर आज नेदरलँडचे आव्हान

कतार : दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. शिवाय अर्जेंटिनाने १९८६ नंतर विश्‍वकरंडकही जिंकलेला नाही. त्यामुळे मेस्सीला निरोप देण्याआधी अर्जेंटिनाचा संघ विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाचा दुष्काळ संपावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. अर्जेंटिना व जेतेपद आता फक्त तीन पावले दूर आहे. अर्जेंटिनाला उद्या होत असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नेदलॅंडशी दोन हात करावे लागणार आहेत. अर्जेंटिनाचा संघ सहाव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.मेस्सी सदस्य असलेल्या संघाने चॅम्पियन्स लीग, ऑलिंपिक, कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. जगातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याने पटकावला आहे; पण विश्‍वकरंडकाच्या जेतेपदापासून मेस्सी सातत्याने दूर राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघाने २०१४ मध्ये विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; पण जर्मनीकडून हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.नेदलॅंड संघाला मात्र या स्पर्धेच्या जेतेपदावर अद्याप मोहोर उमटवता आलेली नाही. नेदरलँड्‌स संघाला १९७४, १९७८ व २०१० मध्ये उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. त्यांनी १९९८ मधील विश्‍वकरंडकात चौथे स्थान, तर २०१४ मधील विश्‍वकरंडकात तिसरे स्थान पटकावले होते. त्यांना २०१० मध्ये स्पेनविरूद्ध अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

लिओच्या आजूबाजूला खेळ रंगतो

लिओ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मेस्सीच्या आजूबाजूला अर्जेंटिनाचा खेळ रंगतो. या संघातील सर्व खेळाडू मेस्सीच्या अवतीभवती खेळाच्या योजना अंमलात आणत आहेत. मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनीच तशी योजना आखली आहे.मेस्सीने या संघाकडून सर्वाधिक तीन गोल केले असून; एका गोलला सहाय्यही केले आहे. मेस्सीने तब्बल १९ वेळा गोलसाठी टार्गेट केले आहे. एवढेच नव्हे, तर मधली फळी व बचाव फळीतील दुवाही तोच आहे.लिओनेल मेस्सीसह रॉड्रिगो दी पॉल, अँजेल दी मारीया या खेळाडूंनीही अर्जेंटिनाच्या विजयात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.

इतिहास दोन्ही संघांच्या बाजूने

अर्जेंटिना - नेदरलॅंड यांच्यामध्ये विश्‍वकरंडकामध्ये नऊ लढती पार पडल्या आहेत. दोन देशांमधील पाच लढती बरोबरीत राहिल्या आहेत. तसेच दोन देशांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन लढती जिंकल्या आहेत.

नेदरलॅंडचा तारणहार कॉडी गॅक्पो

नेदरलॅंड संघासाठी कॉडी गॅक्पो याने शानदार कामगिरी केली आहे. तो नेदरलॅंड संघाचा तारणहार ठरला आहे. त्याने तीन गोल केले आहेत. सर्वाधिक २४ क्रॉसही त्याच्याकडूनच झाले आहेत. मधल्या तसेच बचाव फळीचा दुवा म्हणूनही त्याने ठसा उमटवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने