रुग्णालये भरली, सामूहिक अंत्यविधी

 बिजिंग : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत चालला असून येत्या काही महिन्यांमध्ये ८० कोटी लोकांना संसर्ग होऊ शकतो अशी भीती लंडनस्थित ‘ग्लोबल हेल्थ एअरफिनिटी’ या संस्थेने व्यक्त केली आहे. चीनमध्ये शून्य कोरोना धोरण संपुष्टात आणल्याने २१ लाख मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लसीकरणाचे कमी प्रमाण आणि अँटीबॉडीज घटल्याने येथे कोरोनाचा उद्रेक झाल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.चीनमध्ये परिस्थिती अधिक भीषण झाली असून रुग्णालये भरली असून आता तिथेही बेडही कमी पडू लागले आहेत. औषधांच्या दुकानांतील औषधेही संपू लागली असून उपचार मिळावेत म्हणून रुग्ण हे डॉक्टरांसमोर अक्षरशः लोळण घेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. लहान मुलांना ताप येण्याचे प्रमाण वाढले असून हा ज्वर कमी करण्यासाठी त्यांच्या आयांकडून बटाट्याचा वापर होतो आहे. जिंग प्रांतातील स्मशानभूमीमध्ये चोवीस तास अंत्यसंस्कार सुरू असून आता अनेक ठिकाणांवर सामूहिक अंत्यसंस्कार देखील केले जाऊ लागले आहेत.चीन सरकार कोरोना मृतांचा खरा आकडा दडवीत असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकार चीनमधील ताज्या परिस्थितीसाठी देशाच्या धोरणाला जबाबदार ठरवीत आहेत. चीनने लोकांमधील प्रतिकारक्षमता वाढविण्याऐवजी बचावात्मक धोरणावर अधिक लक्ष दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज नेमक्या त्याच धोरणाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

चीनच्या बऱ्याच गोष्टी चुकल्या

ऑक्सफर्ड विद्यापीठातील साथरोगतज्ज्ञ झेंगमिंग चेन म्हणाले की, ‘‘ खरंतर चीन सरकारने आताच हा निर्णय का घेतला याचे कारण कळायला काही मार्ग नाही. चिनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होऊ शकते. लोकांच्या प्रवासाचे प्रमाणही वाढेल. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील उद्रेकानंतर चीनने सर्व व्यवहार पूर्ववत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. चिनी सरकारने लसीकरण, माध्यमांच्याद्वारे जनजागृती आणि आरोग्यव्यवस्था बळकट करण्यावर भर द्यायला हवा होता. मागील सहा महिन्यांच्या काळामध्ये मला यापैकी एकही गोष्ट झालेली दिसत नाही. लोकही लॉकडाउनला वैतागले होते. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन काढण्यासाठी आंदोलनेही झाली होती.’’

नवा व्हेरिएंट अधिक घातक

चीनमध्ये कोरोनाचा ‘बीएफ.७’ हा नवा व्हेरिएंट सापडला असून या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला एक रुग्ण अठराजणांना बाधित करू शकतो. चीनमधील परिस्थितीचे दाहक चित्र मांडणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये रुग्ण हे जमिनीवर झोपले असून डॉक्टर देखील अतिश्रमामुळे बेशुद्ध पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने