चीनने LACच्या 150 मीटरच्या आत तयार केला रस्ता; ASPIच्या अभ्यासात दावा

 नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीला १० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर आतापर्यंतची ही सर्वात हिंसक चकमक आहे. तवांग जिल्ह्यातील यांगत्से पठार भागात चीनपेक्षा भारताला सामरिक फायदा असल्याचे ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी उपग्रह प्रतिमांच्या आधारे उघड केले आहे.सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भागात भारतीय लष्कराला मात देण्यासाठी चीनने मागील वर्षभरात नव्या लष्करी आणि वाहतुकीच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, जेणेकरून त्याला हवे तेव्हा या भागात आपले सैन्य अतिशय वेगाने पाठवता येईल. दरम्यान, चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) १५० मीटरच्या परिघात पोहोचला आहे.



चीनने एलएसीच्या १५० मीटरच्या आत रस्ता तयार केला आहे. तवांग क्षेत्रात चीनच्या वेगवान पायाभूत विकासामुळे चीनला तेथे वेगाने अतिरिक्त सैन्य तैनात करता येते. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटने (एएसपीआय) केलेल्या नव्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.९ डिसेंबर रोजी यांगत्सेमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास या प्रदेशातील एलएसीवर असलेल्या प्रमुख भागांच्या उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणावर आधारित आहे. या अभ्यास अहवालानुसार चीनने डोकलामपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर लष्करी तयारी केली की, दोन्ही देशांमध्ये कधीही संघर्ष निर्माण होऊ शकतो. हे हेतुपुरस्सर देखील असू शकते. एएसपीआयमध्ये म्हटलं की, तवांग धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. चीन भूतानच्या सीमेत तवांगपासून करत असलेल्या घुसखोरीवर भारत सहज नजर ठेवू शकतो.

यांगत्से पठार हे दोन्ही देशांसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. हे समुद्रसपाटीपासून ५,७०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे सोपे जाते. त्यावर भारताचा कब्जा आहे, जेणेकरून तो चीनपासून सेला पासचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. सेला पास हा तवांगला जोडण्याचा एकमेव मार्ग आहे. यांगत्से पठाराच्या उंच जमिनीवरील कमांडिंग पोझिशनवर भारताचे नियंत्रण आहे. त्यामुळे चीनने या नुकसानीची भरपाई नवीन लष्करी आणि वाहतूक पायाभूत सुविधा उभारून केली आहे, जेणेकरून या माध्यमातून ते या प्रदेशात सैन्य त्वरीत आणू शकतील.

चीनने हद्दीतील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. तसेच तंगवू न्यू व्हिलेजपासून एलएसी रिज-लाइनच्या 150 मीटरच्या आत 'सीलबंद' रस्ता तयार केला आहे, असे अभ्यासात म्हटले आहे. सध्या या रस्त्याच्या शेवटी एक छोटेसे पीएलए कॅम्पही आहे. ९ डिसेंबरच्या चकमकीदरम्यान या नव्या रस्त्यामुळे चिनी सैन्याला भारतीय चौक्यांच्या दिशेने वाटचाल करता आली. पूर्व लडाखमधील गलवान आणि पँगाँग त्सो येथे सैन्य माघारी आणि पुन्हा तैनात करण्यात आल्याने चीनशी संघर्षाचा धोका कमी झाला असला तरी उलट अरुणाचल प्रदेशच्या यांगत्से पठारावर संघर्षाचा कल दिसून येत आहे.अभ्यासात म्हटले की, "चिनी सैन्याने सीमा चौक्यांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी आणि यांगत्सेमधील यथास्थिती नष्ट करण्यासाठी नुकत्याच केलेल्या चिथावणीखोर हालचालींनी धोका निर्माण झाला आहे.अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय लष्कराशी झालेल्या चकमकीतनंतर चीनने ईशान्य सीमेपासून १५० किमी अंतरावर ड्रोन आणि लढाऊ विमाने तैनात केली आहेत. मॅक्सर टेक्नॉलॉजीच्या उपग्रह प्रतिमेत चीनच्या कारवाया स्पष्टपणे दिसून येतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने