भारताबरोबरील संबंधात हस्तक्षेप नको; चीनने अमेरिकेला बजावले

वॉशिंग्टन : भारत व चीन यांच्यातील संबंधांत अमेरिकेने हस्तक्षेप करू नये, असे चीन सरकारने अमेरिकी अधिकाऱ्यांना बजावले होते, असे अमेरिकेच्या ‘पेन्टॅगॉन’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संपूर्ण संघर्षात चिनी सैन्याने या घटनेला फारसे महत्त्व देणे टाळले होते. आमच्या प्रदेशाचे रक्षण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगत चीनने भारताबरोबरील द्विपक्षीय संबंधांना त्यामुळे तडा जाणार नाही, याची काळजी घेतली होती. ‘भारताने अमेरिकेबरोबर अधिक जवळीक करू नये, यासाठीच चिनी सैन्याने भारताबरोबरील तणाव वाढणार नाही, यासाठी प्रयत्न केले होते. तसेच, चीनच्या भारताबरोबरील संबंधांत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालू नये, असेही बजावले होते,’ असे अहवालात म्हटले आहे.भारत-चीन सीमावादावर टिप्पणी केल्याबद्दल चीनने यापूर्वीही अमेरिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. यावर्षी जूनमध्ये, अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी भारताला लागून असलेल्या सीमेनजीक चीनने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत, ‘आगीत तेल ओतू नये’ असे बजावले होते. वाद मिटविण्याची इच्छा आणि क्षमता भारत आणि चीनमध्ये आहे आणि आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला होता.

चीनकडे १५०० अण्वस्त्रे असतील : अमेरिका

वॉशिंग्टन : चीन त्यांची अण्वस्त्रक्षमता वाढवत असून पुढील बारा वर्षांमध्ये त्या देशाकडे सुमारे १,५०० अण्वस्त्रे असतील, असा अंदाज अमेरिका सरकारने व्यक्त केला आहे. चीनकडे सध्या चारशे अण्वस्त्रे आहेत. आगामी दशकात चीन त्यांच्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करेल, असे ‘पेन्टॅगॉन’ने संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, चीन त्यांच्या अण्वस्त्रांचा जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून मारा करण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांच्या संख्येत वाढ करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने