देशात यंदा थंडीचा कहर होणार

 नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात थंडीने आता चांगलाच जोर धरला असून अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान १० अंश किंवा त्याखाली पोहोचले आहे. मात्र यंदा भारतात नेहमीपेक्षा जास्त कडाक्याची थंडी पडण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. देशाच्या डोंगराळ भागात प्रमाणापेक्षा जास्त बर्फवृष्टी होण्याची व मैदानी भागात वारंवार अवकाळी पावसाची शक्यता आहे. सामान्य भाषेत पश्चिमी विक्षोभ ( वेस्टर्न डिस्टर्बन्स-वेस्टरलीज) वाढल्याने भारतीय उपखंड यंदा थंचीने चांगलाच गारठण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.वेस्टरलीज साधारण भूमध्य समुद्रात सुरू होतो. तो नंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमार्गे मध्यपूर्वेतून भारतात प्रवेश करतो. भारतात ते प्रथम काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पोहोचतो. साधारणतः त्याचा प्रवास आग्रापर्यंत असतो मात्र यावर्षी वेस्टरलीजने दिल्लीकडे आक्रमण केले आहे. दिल्लीकडे सरकणाऱ्या या वेस्टर्लीजमध्ये प्रचंड प्रमाणावर आर्द्रता- दमटपणा असल्याचे सांगण्यात येत आहे.यामुळे डोंगराळ राज्यांत प्रमाणापेक्षा जास्त बर्फवृष्टी तर मैदानी भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. वेस्टरलीजच्या रेषेखालील भागात म्हणजे दिल्लीपासून मध्य, पूर्व-पश्चिम व दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कहर करण्याची शक्यता आहे. याचा सरळ अर्थ असा की, यावेळी दिल्लीत डिसेंबर-जानेवारीपासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतचे अडीच महिने प्रमाणापेक्षा जास्त कडाक्याची थंडी पडेल असा हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने