बॉलिवूडची ‘दामिनी’ पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर; अभिनेत्रीने व्यक्त केली पुनरागमनाची इच्छा

मुंबई : ९० च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रि या अभिनेत्रीला कोण ओळखत नाही? अगदी मोजके चित्रपट करून कित्येकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मीनाक्षी सध्या चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. १९९५ साली हरिश मैसूर या इन्व्हेस्टमेंट बँकरबरोबर लग्न करून मीनाक्षीने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. नुकतंच तिने एका कार्यक्रमात चित्रपटात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

१९९६ च्या सनी देओलच्या ‘घातक’ चित्रपटात मीनाक्षी शेवटची दिसली होती. शिवाय २०१६ मध्ये जेव्हा सनीने घायल चित्रपटाचा पुढचा भाग काढला तेव्हा त्यात तिची जुन्या चित्रपटातील झलक पाहायला मिळाली होती. नुकतंच मीनाक्षीने अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर पुण्यातील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात तिने पुन्हा पदार्पण करायची इच्छा व्यक्त केली आहे.जॅकी श्रॉफ यांच्या ‘हीरो’ या चित्रपटातून मीनाक्षीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष घाई यांनी केलं होतं. पुण्याच्या कार्यक्रमात मीनाक्षीने जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आणि त्यांचं वैयक्तिक जीवन याबद्दल खुलासा केला. शिवाय चित्रपटात पुन्हा येण्यासाठी खूप उत्सुक असल्याचंही तिने सांगितलं.मीडियाशी संवाद साधताना मीनाक्षी म्हणाली, “मला चित्रपटात पुनरागमन करायचं आहे. काहीतरी अपूर्ण राहिलंय असं मला सतत वाटतंय. ओटीटीमुळे बॉलिवूडच्या कलाकारांना चांगलीच संधी मिळाली आहे. सध्या अभिनेत्रींच्या दृष्टिकोनातून चित्रपटाची कथा लिहिली जाते. भूतकाळात केलेलं काम पाहता मी कोणत्याही भूमिकेसाठी तयार आहे, एकाच साच्यातील भूमिकेपुरतं मर्यादित राहणं मला पटत नाही.” मीनाक्षीच्या या वक्तव्यानंतर तिचे चाहते आणि चित्रपटप्रेमी तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट बघत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने