त्या' मंत्र्यांमध्ये धमक असली तर त्यांनी बेळगावात यावं; हसन मुश्रीफांचं थेट चॅलेंज

 कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. यानंतरही कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडण्यात आल्यानं आणि आक्रमक वक्तव्य करण्यात आल्यानं तणावात भर पडली.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील  आणि शंभूराज देसाई  हे सीमा भागात  जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण, त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कर्नाटकातील सीमाबांधवांनी 19 डिसेंबरला बेळगावमध्ये मेळावा ठेवला आहे. जर तुमच्यात धमक असेल तर या मेळाव्याला तुम्हीपण या असं जाहीर आव्हान माजी मंत्री हसन मुश्रीफ  यांनी राज्य शासनाला दिलंय. 

महाविकास आघाडीच्या वतीनं कर्नाटक शासनाविरोधातील आंदोलनावेळी मुश्रीफ बोलत होते. सुमारे तीन तास चालेल्या या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं. मुश्रीफ पुढं म्हणाले, कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असल्यानं भावनिक वातावरण करण्यासाठी महाराष्ट्राला डिवचण्याचं काम सुरू आहे. आमचे दोन्ही समन्वय मंत्री घाबरून बेळगावला गेलेले नाहीत. ज्या दिवशी कर्नाटकचे अधिवेशन आहे, त्याच दिवशी सीमाबांधवांचा महामेळावा आहे. त्यामुळं धमक असली तर मंत्र्यांनी तिथं यावं, असं खुलं आव्हान मुश्रीफांनी केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने