देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय; उदयनराजे भाजपवर संतापले

रायगड :  महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांकडून हे करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निगडीत नेत्यांकडून महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरून भाजपचे खासदार छत्रपती छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी राजगडवर आयोजित आक्रोश मेळाव्यात उदयनराजे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा संदेश का दिला? सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने राहावे, यासाठी त्यांनी लढा दिला. मात्र त्याच शिवाजी महाराजांचा अवमान देशात होतोय. या अवमानासाठी आपण गप्प बसणार आहोत का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.

उदयनराजे पुढं म्हणाले की, सर्व राजकीय पक्ष स्वार्थी झाले. महाराजांनी सर्वधर्मियांना एकत्र केला. मात्र राजकीय नेत्यांकडून शिवाजी महाराजांविषयी तेढ निर्माण केली. थोडक्यात सर्वधर्मसमभावाचा विचार स्वार्थासाठी केला जातो. राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात. तर राज्याचे प्रमुख राज्यपाल असतात. त्या राज्यपालाचं मी नाव घेणार नाही. पण ते शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या विधानावर पांघरून घालणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला.पूर्वीच्या काळी देश मुघलांच्या तावडीत होता. आता पुन्हा देश विकृत लोकांच्या हातात गेलाय, हे सांगताना खंत वाटते. शिवाजी महाराजांनी विकृतांच्या हातातून देश बाहेर काढला. आता तुम्हीच लोक लोकशाहीचे राजे आहात. आता तुम्हीच यातून देशाला बाहेर काढू शकता, असंही उदयनराजे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने