युरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती

कतार: फिफा विश्‍वकरंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना उद्यापासून सुरुवात होणार आहे. फिफा क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ब्राझीलसमोर बाराव्या स्थानावरील क्रोएशियाचे आव्हान असणार आहे. क्रमवारी व सध्याचा फॉर्म बघता या लढतीत ब्राझीलचे पारडे जड आहे, असे म्हटले जात असले तरी मागील चार विश्‍वकरंडकांत (२००६, २०१०, २०१४ व २०१८) युरोपियन देशांकडून पराभूत झाल्यामुळे ब्राझीलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे युरोप खंडातील क्रोएशियासमोर ब्राझीलचा संघ निष्काळजी खेळ करील असे वाटत नाही.

२००६ मधील विश्‍वकरंडकात फ्रान्सने ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते. त्यानंतर २०१० विश्‍वकरंडकात नेदरलँडस्‌ संघाने ब्राझीलवर उपांत्यपूर्व फेरीत २-१ असा विजय साकारला होता. २०१४ मधील विश्‍वकरंडकात जर्मनीने ब्राझीलचा उपांत्य फेरीच्या लढतीत ७-१ असा धुव्वा उडवला. मागील २०१८ मधील विश्‍वकरंडकात बेल्जियमकडून ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत २-१ असा पराभवा पत्करावा लागला होता. यंदाही ब्राझीलसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युरोपीय देशाचे आव्हान असणार आहे. ब्राझीलचा संघ क्रोएशियाचे आव्हान कशाप्रकारे परतवून लावतो हे पाहणे रंजक ठरेल.ब्राझीलचेच वर्चस्व

ब्राझील - क्रोएशिया यांच्यामध्ये २००६ व २०१४ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडकातील लढतींमध्ये ब्राझीलचेच वर्चस्व राहिले आहे. २००६ मधील विश्‍वकरंडकातील लढतीत ब्राझीलने क्रोएशियावर १-० असा विजय संपादन केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ब्राझीलने क्रोएशियाला ३-१ असे पराभूत केले होते.

जेतेपदाचे लक्ष्य : नेमार

दुखापतीमधून बरा होत उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पुनरागमन करणारा नेमार याप्रसंगी म्हणाला, यंदाच्या स्पर्धेतील चार लढती पूर्ण झाल्या आहेत. आता जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी आणखी तीन लढतींमध्ये विजय आवश्‍यक आहे. आमच्या संघातील खेळाडूंनी जेतेपदाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने