भाजपमध्येच बेकी, काँग्रेसमध्ये एकी: सचिन पायलट

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या सचिन पायलट यांनी अलिकडेच एक पाऊल मागे घेतले होते. आता भारत जोडो यात्रेचे टायमिंग साधत त्यांनी भाजपमध्येच एकी नसल्याचा दावा केला. गटबाजीमुळे भारत जोडो यात्रेवर राजस्थानात परिणाम होण्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली.गेहलोत यांच्याशी आपले मतभेद असल्यावरून टीका करणाऱ्या भाजपला पायलट यांनी धारेवर धरले. ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी ज्या पक्षात किमान डझनभर दावेदार आहेत त्यांच्याकडून अशी टीका होणे ही मोठीच गोष्ट म्हणावी लागेल. गेल्या चार वर्षांत राजस्थानात विरोधी पक्ष म्हणून भाजपला आपले योग्य स्थान निर्माण करता आलेले नाही. त्यांच्यात प्रचंड गटबाजी आहे.भारत जोडो नव्हे तर काँग्रेस जोडो यात्रेची गरज असल्याचे टोमणे भाजपने अनेक वेळा मारले आहेत. यास प्रत्यूत्तर देताना पायलट म्हणाले की, भाजपला इतरांकडे बोटे दाखविण्याची आणि दुसऱ्याच्या विषयात ढवळाढवळ करण्याची खोडच आहे. वास्तविक एक विरोधी पक्ष म्हणून काय साध्य केले याचे भाजपने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.भारत जोडो यात्रेला प्रत्यूत्तर म्हणून भाजपने राजस्थानात दोन दिवसांपूर्वी जनआक्रोश रथयात्रा काढली. ही यात्रा पहिल्या दिवसापासून अपयशी ठरल्याचा दावा पायलट यांनी केला.गेहलोत यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेच्या भवितव्यावर परिणाम होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पायलट यांनी मात्र ही चर्चा म्हणजे प्रसार माध्यमांनी निर्माण केलेल्या कथा असल्याची टिप्पणी केली. गेहलोत यांच्या टिप्पणीमुळे यात्रेच्या भवितव्यावर सावट निर्माण झाले आहे का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, या घडीला मी यात्रेच्या राजस्थानमधील प्रवेशावर सर्व लक्ष केंद्रीत केले आहे.राज्यात काँग्रेसमध्ये संपूर्ण एकी असल्याचा दावा करून ते म्हणाले की, आम्ही भारत जोडो यात्रा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त यशस्वी करण्याचा निश्‍चय बाळगला आहे. इथे ‘अ‘, ‘ब‘ किंवा ‘क‘ अशा व्यक्तींचा प्रश्न नाही. एक पक्ष म्हणून सरकार तयार करण्यासाठी आम्ही कसून परिश्रम घेतले. संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांच्याशी यात्रेच्या स्वागताच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार असल्याने ऐतिहासिक स्वागत

राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेचा मार्ग सुमारे ५०० किलोमीटर आहे. काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यातून ही यात्रा प्रथमच जाणार आहे. आतापर्यंत प्रवास झालेल्या राज्यांत आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यामुळे राजस्थानात ऐतिहासिक स्वागत करण्याचा निर्धार असल्याची भावना पायलट यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने