संजय राऊतांनी अनिल देशमुखांची घेतली भेट; नवाब मलिकांचा उल्लेख करत म्हणाले, “ज्यापद्धतीने आमच्यावर…”

मुंबई: कथित १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले आहेत. दरम्यान, आज खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

“अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ ते सार्वजनिक जिवनात आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं आहे. त्यांनी विदर्भातेच नेतृत्व केलं आहे. मात्र, ज्या पद्धतीने त्यांच्यावर माझ्यावर तसंच नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे, यावरून मनी लॉंडरिंग कायद्याचा कशा पद्धतीने गैरवापर होतो आहे, हे दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. “काल शरद पवार यांनीही सांगितलं की आमच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर कसा होतो, त्याच उत्तम उदाहरण आहे. शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही घरी पोहोचलो आहे”, असेही ते म्हणाले.“देशात लागू असेलला मनी लॉंडरिंगचा कायदा दशहतवाद्यांस मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निर्माण झाला आहे. आमच्यासारखे राष्ट्रभक्त कोणाला दहशतवादी वाटत असतील. तर संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.“मी आज अनिल देशमुखांना भेटायला आलो, कारण ते ज्या संकटातून गेले त्यातून मी सुद्धा गेलो आहे. अशा वेळी आपल्या कुटुंबाची काय भावना असते, हे मला माहिती आहे. असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. राज्याची सत्ता अडीच वर्ष आमच्या हातात होती. युपीएच्या काळातही आम्ही सत्ता जवळून बघितली. मात्र, आम्ही कधी आमच्या शत्रूशीही इतक्या अमानुषपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाही”, असेही ते म्हणाले.

“या देशातील न्यायवस्थेत असे काही रामशास्री आहेत. ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुखांना जामीन देताना उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणं फार गंभीर आहेत. माझ्या जामीनाच्या बाबतीतही सत्र न्यायालयाची निरीक्षणं अत्यंत गंभीर आहेत. अशा वेळी ज्या तपास यंत्रणांनी चुकीची कारवाई केली, राजकीय सुत्रधार म्हणून ज्यांनी काम केलं. त्यांच्या भविष्यात कारवाई नक्कीच होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने